डॉक्‍टरांच्‍या संपामुळे रुग्णांचे हाल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य विभागाअंतर्गत कंत्राटी स्वरूपात काम करणारे तज्ज्ञ डॉक्‍टर संपावर गेले आहेत.

अलिबाग (बातमीदार) : अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य विभागाअंतर्गत कंत्राटी स्वरूपात काम करणारे तज्ज्ञ डॉक्‍टर संपावर गेले आहेत. त्यामुळे उपचारासाठी आलेल्या रुग्णांचे प्रचंड हाल झाले आहेत. येथे कार्यरत असलेल्या डॉक्‍टरांच्या कामावरही त्याचा परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी रुग्ण कल्याण समितीचे सदस्य अजित पाटील यांनी निवेदनाद्वारे आवाहन केले आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांना निवेदन दिले आहे. 

जिल्हा रुग्णालयात एनआरएचएम अंतर्गत डॉ. मनोज कोळी, डॉ. अमृत माने, डॉ. महेंद्र घाटे, डॉ. मेघा घाटे, डॉ. सी. पी. पांडकर, डॉ. राजश्री बडगीरे (भोसले), डॉ. कृष्णा बडगिरे, डॉ. अरुण गवळी, डॉ. आरती कोळी, डॉ. चंद्रशेखर साठ्ये आदी भूलतज्ज्ञ, अस्थिरोग तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ काम करत आहेत. गेल्या पाच महिन्यांपासून या तज्ज्ञांचे वेतन देण्यास सरकार उदासीन ठरले आहे. त्यामुळे ऑक्‍टोबर महिन्यात या सर्वांनी संप पुकारला होता. त्यानंतर १० नोव्हेंबरपर्यंत निर्वाणीचा इशारा दिला होता. परंतु, आरोग्य उपसंचालक यांच्याकडून कोणत्याही प्रकारची सकारात्मक भूमिका घेण्यात आली नसल्याने १४ नोव्हेंबरपासून डॉक्‍टरांनी पुन्हा संप पुकारला आहे. 

डॉक्‍टरांच्या या संपामुळे उपचारासाठी आलेल्या रुग्णांचे प्रचंड हाल झाले आहेत. त्यांच्यावर योग्य उपचारही होत नाहीत. काही रुग्णांच्या शस्त्रक्रिया होण्यास अडथळे निर्माण झाले आहेत. रुग्णांची गैरसोय झाल्याने नातेवाइकांमध्ये रुग्ण प्रशासनाच्या कारभाराबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यावर जिल्हा रुग्णालयातील रुग्ण कल्याण समिती सदस्य अजित पाटील यांनी पुढाकार घेत जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेऊन डॉक्‍टरांना तातडीने रुग्णालयात हजर होण्याचे आवाहन केले. त्याबाबतचे त्यांना निवेदनही देण्यात आले आहे.

जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. आज शस्त्रक्रिया होणार होती. त्यामुळे त्याची व्यवस्थाही करण्यात आली होती; मात्र शस्त्रक्रिया विभागात नेले असता, तेथे संबंधित डॉक्‍टर उपलब्ध नसल्याने शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे खूप हाल झाले असून, अजून किती दिवस वाट पाहावी लागणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 
- चिमाबाई खालू, रुग्ण, वाशी हवेली- तळा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Doctor on strike