पाचव्या दिवशीही डॉक्‍टर संपावरच

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मार्च 2017

महापालिका वैद्यकीय शिक्षक संघटनेचाही इशारा
मुंबई - उच्च न्यायालयाने डॉक्‍टरांच्या मागण्या पूर्ण करण्याचा आदेश दिल्यानंतर आणि मुख्यमंत्र्यांनी सुरक्षेची जबाबदारी घेतल्यानंतरही निवासी डॉक्‍टरांनी "सामूहिक रजा' आंदोलन मागे घेण्यास नकार दिला आहे. हातात लेखी आदेश येत नाही तोवर आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार डॉक्‍टरांनी केला आहे.

महापालिका वैद्यकीय शिक्षक संघटनेचाही इशारा
मुंबई - उच्च न्यायालयाने डॉक्‍टरांच्या मागण्या पूर्ण करण्याचा आदेश दिल्यानंतर आणि मुख्यमंत्र्यांनी सुरक्षेची जबाबदारी घेतल्यानंतरही निवासी डॉक्‍टरांनी "सामूहिक रजा' आंदोलन मागे घेण्यास नकार दिला आहे. हातात लेखी आदेश येत नाही तोवर आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार डॉक्‍टरांनी केला आहे.

न्यायालयाने रुग्णालयांत सशस्त्र सुरक्षा रक्षक नेमण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवासी डॉक्‍टरांच्या प्रतिनिधींची भेट घेऊन त्यांना आश्‍वासन दिले आहे. तरीही निवासी डॉक्‍टर आंदोलन मागे घेण्याच्या मनःस्थितीत नाहीत. दरम्यान, मुंबईतील सुमारे 1700 डॉक्‍टरांना संबंधित रुग्णालयांतील डॉक्‍टरांनी निलंबनाच्या नोटिसा दिल्या. सर्व बाजूंनी दबाव असताना आणि मागण्या मान्य होऊनही डॉक्‍टरांनी संप मागे घेण्यास नकार दिला आहे.
महापालिका वैद्यकीय शिक्षक संघटनेने आधी सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे. वरिष्ठ डॉक्‍टरांवर कामाचा बोजा वाढला आहे.

त्यामुळे केवळ अतिदक्षता विभागात सेवा देण्याचा निर्णय घेत असल्याचे संघटनेने जाहीर केले आहे. सोमवारपर्यंत तोडगा न निघाल्यास 48 तासांत सामूहिक राजीनामे देण्यात येतील, असा निर्णय संघटनेचे सरचिटणीस डॉ. रवींद्र देवकर यांनी जाहीर केला. तोपर्यंत काळ्या फिती लावून आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक आश्‍वासनांनंतरही निवासी डॉक्‍टर कामावर रुजू होत नसल्याने त्यांच्याविरोधात नाराजीचे वातावरण आहे.

दिवसभरातील घडामोडी
- दिवसभर डॉक्‍टरांना नोटीस
- दिल्लीतील निवासी डॉक्‍टर राज्यातील डॉक्‍टरांच्या सामूहिक रजा आंदोलनाला पाठिंबा देत सकाळी 9 ते सायंकाळी 4 पर्यंत सामूहिक रजेवर.
- राज्यातील इंडियन मेडिकल असोसिएशनशी जोडलेले सुमारे 40 हजार डॉक्‍टर संपावर.
- वैद्यकीय शिक्षक संघटना संपात सहभागी. काळ्या फिती लावून शिक्षकांनी नोंदवला निषेध.
- उच्च न्यायालयाने मागण्या मान्य करून कामावर रुजू होण्याचा दिला आदेश.
- मुख्यमंत्र्यांनी भेटून आंदोलन मागे घेण्यास सुचवले. डॉक्‍टरांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची असेल, असे जाहीर केले.
- काही रुग्णलयांतील डॉक्‍टर कामावर येण्यास सुरुवात.
- न्यायालयाचा आदेश हाती न आल्यामुळे संप मागे घेण्यास नकार.

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांत 105 निवासी डॉक्‍टर कामावर रुजू झाल्याची माहिती प्रमुख पालिका रुग्णालयांचे संचालक डॉ. अविनाश सुपे यांनी दिली. गुरुवारी जे.जे. रुग्णालयात 92 डॉक्‍टर कामावर आले, असे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले.

Web Title: doctor strike