डॉक्‍टरच्या आत्महत्येप्रकरणी चौकशी समिती स्थापन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 मे 2019

तक्रारी ऐकून घेणार
अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून दर दहा दिवसांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून तक्रारी ऐकल्या जातील, असे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. भारमल यांनी सांगितले. निवासी डॉक्‍टरांच्या समस्या जाणून घेणार असल्याची माहिती सेंट्रल मार्डच्या अध्यक्ष डॉ. कल्याणी डोंगरे यांनी दिली.

मुंबई - मुंबई सेंट्रल येथील महापालिकेच्या नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी (वय २३) या निवासी डॉक्‍टरच्या आत्महत्येप्रकरणी चौकशीसाठी समिती नेमण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणी आग्रीपाडा पोलिस तपास करीत असल्याचे सांगत अधिष्ठात्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला.

नायर रुग्णालयातील स्त्रीरोग विभागात बुधवारी (ता. २२) दोन शस्त्रक्रिया केल्यानंतर डॉ. पायल वसतिगृहातील खोलीत आल्या. त्यानंतर त्यांनी खोलीतील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही माहिती मिळाल्यावर कूपर रुग्णालयात ॲनेस्थेशिया विभागात शिकणारे त्यांचे पती नायर रुग्णालयात आले. या प्रकरणी पोलिस तपास करीत असल्याचे सांगत अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी अधिक बोलणे टाळले. 

डॉ. पायल यांनी रॅगिंगबद्दल 
तक्रार केली नव्हती; मात्र रॅगिंग प्रतिबंधक कायद्यानुसार नेमलेली समिती चौकशी करीत असल्याची माहिती त्यांनी दिली. या चौकशी समितीत मार्डच्या एका सदस्याचाही समावेश आहे.

Web Title: Doctor Suicide Case Inquiry Committee Police