'अवघ्या' 85 व्या वर्षी डॉक्‍टरेट!

'अवघ्या' 85 व्या वर्षी डॉक्‍टरेट!
'अवघ्या' 85 व्या वर्षी डॉक्‍टरेट!

मुंबई - वय "अवघे' 85 वर्षे... वयोमानानुसार शारीरिक दुखणी... तरीही रोजचा 15 तासांचा अभ्यास... कधी रात्री जागून केलेले पाठांतर किंवा लेखन... थकलेल्या शरीराने मुंबई-जळगाव एकट्याने केलेला प्रवास आणि साधारण दोन वर्षांच्या तपश्‍चर्येनंतर मिळालेली डॉक्‍टरेट पदवी... कांदिवलीतील सामाजिक कार्यकर्ते आणि माजी शिक्षक प्रकाश बंद्रे यांची कहाणी अनेकांना प्रेरणादायी आहे. वयाच्या 85व्या वर्षी त्यांनी डॉक्‍टरेट मिळवली.

अर्धवट शिक्षणाची भविष्यवाणी खोटी ठरवत अंधश्रद्धेच्या टोकाच्या विरोधामुळे त्यांच्या डॉक्‍टरेट मिळण्याच्या प्रयत्नांना अखेर यश आले. बंद्रे यांनी अनेक वर्षांपासून कांदिवलीतील राम मनोहर लोहिया शिक्षण संस्थेत अध्यापन केले. निवृत्तीनंतरही संस्थेच्या कामात त्यांचे सक्रिय योगदान होते. मृणाल गोरे यांच्या साथीने अनेक आंदोलनांमध्ये त्यांनी सहभाग घेतला. शिक्षणाची पहिल्यापासूनच आवड. अंधश्रद्धेला कडाकडून विरोध. भविष्य सांगण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीने "तुमचे पुढील शिक्षण होऊच शकत नाही' असे सांगितल्यानंतर त्यांच्या विचारांनी वेग घेतला. एकूणच अशा विचारसरणीला विरोध असल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत अंधश्रद्धेला खोटे ठरवायचे म्हणून त्यांनी डॉक्‍टरेट करण्याचे ठरवले; मात्र वयामुळे शारीरिक व्याधींचाही त्यांना सामना करायचा होता. प्रचंड आत्मबळाच्या जोरावर त्यांचा प्रवास सुरू झाला. "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची वृत्तपत्रे आणि नियतकालिकांतील लेखांचा सामाजिक व वाङ्‌मयीन अभ्यास' या विषयावर शोधनिबंध लिहायचे त्यांनी ठरवले. त्यासाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात प्रवेशही घेतला. डॉ. म. सू. पगारे यांचे मार्गदर्शन घेतले. त्यासाठी मग अगदी 15-15 तास अभ्यास केला. अनेक रात्री जागवल्या. त्याचा शारीरिक त्रास होत होता; परंतु जिद्द तसूभरही कमी झाली नव्हती. अखेर पीएच.डी. मिळवण्यात बंद्रे यांना यश आले.

बंद शाळेत वृद्धाश्रमासाठी प्रयत्न
मी मेहनत घेतली आणि ती फळाला आली याचा आनंद असला तरीही एका अंधश्रद्धेला खोटे ठरवण्यात मला यश आले याचे अधिक समाधान आहे. याही वयात सामाजिक काम सुरूच आहे, असे प्रकाश बंद्रे यांनी सांगितले. त्यांनी सुरू केलेली राम मनोहर लोहिया मराठी माध्यमाची शाळा अनेक प्रयत्न करूनही विद्यार्थीच नसल्याने बंद होण्याच्या मार्गावर आहे. शाळा नसली तरी आता त्यात वृद्धाश्रम करावे आणि ज्येष्ठ नागरिकांची सोय करून द्यावी म्हणून त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com