उपचारादरम्यान रुग्ण दगावल्याने डॉक्‍टरला मारहाण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

उपचार घेत असलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याने उपचारात डॉक्‍टरांनी हलगर्जी केल्याचा ठपका ठेवून नातेवाईकांनी डॉक्‍टरांसह नर्स, सफाई कामगार, सुरक्षा रक्षकाला मारहाण केली आहे.

भिवंडी : तालुक्‍यातील कोनगाव येथील वेद हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याने उपचारात डॉक्‍टरांनी हलगर्जी केल्याचा ठपका ठेवून नातेवाईकांनी डॉक्‍टरांसह नर्स, सफाई कामगार, सुरक्षा रक्षक अशा सहा जणांना बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. डॉ. संदीप राव, नर्स शैलम राजपुरे, ज्योती डिसोझा, नीतू देवराज, सुरक्षा रक्षक सचिन सावंत, सफाई कामगार विद्या अशी मारहाण झालेल्यांची नावे आहेत. 

शहापूर तालुक्‍यातील डोळखांब येथील महिला लीलाबाई वाडकर (68) यांना डेंगीची लागण झाल्याने त्यांना प्रथम उपचारासाठी कल्याणच्या गुरुकृपा हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मात्र त्यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना अतिदक्षता विभागात उपचाराची आवश्‍यकता होती. मात्र गुरुकृपा हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात बेड शिल्लक नसल्याने त्यांना तातडीने कोनगांव येथील वेद हॉस्पिटलमध्ये हलवण्यात येऊन उपचार सुरू होते. मात्र सोमवारी सकाळी उपचार सुरू असताना लीलाबाई वाडकर यांचा अचानक मृत्यू झाला.

हा मृत्यू डॉक्‍टरांच्या निष्काळजीने झाल्याचा आरोप नातेवाईकांनी करून हॉस्पिटलची तोडफोड करून डॉक्‍टरांसह नर्स, सुरक्षा रक्षक, वार्डबॉय अशा सहा जणांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत नर्स नितू देवराज यांच्या डाव्या हाताच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी कोनगांव पोलिस ठाण्यात दोघा नातेवाईकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास एपीआय के. जी. ढोके करीत आहेत. 

web title : Doctors beat up doctor for treatment


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Doctors beat up doctor for treatment