डॉक्‍टरांची वाणवा संपणार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

नवी मुंबई - महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये लवकरच सीपीएस कोर्सेस सुरू होणार असल्याने रुग्णालयांमधील डॉक्‍टरांची वाणवा संपुष्टात येणार आहे. आरोग्य विभागातील सीपीएस कोर्सेस विभागाचे संचालक डॉ. गिरीष महेंद्रकर यांनी याला तत्त्वतः मंजुरी दिली आहे, माहिती आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी दिली. हे कोर्सेस सुरू झाल्यानंतर वर्षाला 40 निवासी डॉक्‍टर रुग्णालयांना मिळणार आहेत. 

शहरातील नागरिकांना आरोग्य सेवा देण्यासाठी महापालिकेने नवी मुंबईत सीबीडी-बेलापूर, नेरूळ, वाशी व ऐरोली येथे सामान्य व माता-बाल रुग्णालये सुरू केली आहेत; परंतु या रुग्णालयांमध्ये उपकरणे व डॉक्‍टर नसल्यामुळे ती ओस पडली आहेत. नवी मुंबईतील वाशीवगळता इतर कोणत्याही पालिकेच्या रुग्णालयांमध्ये चांगल्या आरोग्य सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे वाशी रुग्णालयावर ताण येतो. विशेषतः सीबीडी-बेलापूर, नेरूळ व ऐरोली येथील महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये काही आजारांवरील डॉक्‍टर नसल्यामुळे बाह्यरुग्ण विभाग बंद आहेत. यासाठी पालिकेने अनेकदा थेट मुलाखती घेतल्या; परंतु अपेक्षेपेक्षा कमी पगार व कामाचे बंधन असल्यामुळे डॉक्‍टर पालिकेच्या सेवेत येण्यास तयार नाहीत. त्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये सीपीएस कोर्स सुरू करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला. त्यासाठी त्यांनी राज्याच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना विनंती केली. त्यानुसार काही दिवसांपूर्वीच सीपीएस कोर्सेसचे संचालक महेंद्रकर यांनी पालिका रुग्णालयाची पाहणी केली. त्यानंतर हे कोर्स सुरू करण्याची परवानगी दिली. नीट परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांना हा कोर्स करता येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून महासभेच्या मान्यतेसाठी तो सादर केला जाणार आहे, अशी माहिती आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी दिली. 

Web Title: Doctors issue end in hospital