मोनो रेलला श्‍वानांचे सुरक्षा कवच

तेजस वाघमारे
शनिवार, 25 मार्च 2017

मोनो डेपोमध्ये श्‍वानांसाठी 20 खोल्या उभारणार

मोनो डेपोमध्ये श्‍वानांसाठी 20 खोल्या उभारणार
मुंबई - उपनगरी रेल्वे मार्गावर लोखंड, दगड यांसारख्या वस्तू ठेवून घातपात घडवण्याचे प्रकार सुरू असल्याने रेल्वे प्रशासनाने सुरक्षेसाठी विविध उपाययोजना आखल्या आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मोनो रेलनेही विशेष खबरदारी घेतली आहे. स्थानकांवर श्‍वान पथकाद्वारे सुरक्षा वाढवण्याचे ठरवले आहे. यासाठी वडाळा येथील मोनोच्या डेपोमध्ये श्‍वानांसाठी 20 खोल्या उभारण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) घेतला आहे. यासाठी कंपन्यांकडून निविदा मागवण्यात आल्या आहेत.

चेंबूर-वडाळा-गाडगे महाराज चौक या 20 किलोमीटरच्या मोनो मार्गापैकी पहिल्या टप्प्यात चेंबूर ते वडाळापर्यंत मोनो सुरू झाली आहे; तर वडाळा ते गाडगे महाराज या दुसऱ्या टप्प्यातील मोनोचे काम प्रगतिपथावर आहे. मोनोची सेवा दोन टप्प्यांमध्ये सुरू झाल्यानंतर प्रवाशांची संख्या वाढणार आहे. सध्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फत प्रवाशांच्या सुरक्षेसाठी संशयित वस्तूंच्या तपासणीसाठी काही वेळासाठी श्‍वान आणण्यात येतात; मात्र स्थानक परिसरात त्यांच्या विश्रांतीसाठी आणि निगा राखण्यासाठी खोली नाही. यामुळे सुरक्षा वाढवण्यात अडचणी येत आहेत. यातच मोनोचा दुसरा टप्पाही काही महिन्यांमध्ये सुरू होणार असल्याने या संपूर्ण मार्गावर सुरक्षा व्यवस्था राखण्यासाठी सुरक्षा यंत्रणेला अधिक सुविधांची गरज आहे.

मोनो कार शेड परिसरातच श्‍वानांच्या विश्रांतीसाठी खोली देण्यात यावी, अशी मागणी सुरक्षा यंत्रणेकडून झाल्याने एमएमआरडीएने वडाळा येथील डेपोमध्ये 20 श्‍वानांसाठी खोली उभारण्यासाठी निविदा मागवल्या आहेत. यासाठी अंदाजे एक कोटी 21 लाख 72 हजार 390 रुपयांचा खर्च अपेक्षित असून, कंत्राटदारांना 7 एप्रिलपर्यंत ऑनलाईन निविदा भरता येणार आहेत. त्यानंतर 12 एप्रिलला निविदा उघडण्यात येणार आहेत. सुरक्षा यंत्रणेने केलेल्या मागणीनुसार मोनो डेपोमध्ये श्‍वानांसाठी 20 खोल्या उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी एमएमआरडीएने निविदा मागवल्या असल्याचे एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त संजय खंदारे यांनी सांगितले.

Web Title: dog security for mono rail