विकास निधीवरून मंत्री कपिल पाटील आणि खासदार डॉ. शिंदे यांची जोरदार टोलेबाजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kapil patil and shrikant shinde

केंद्र व राज्य मिळून डबल इंजिनचे सरकार आले आहे. त्याची ताकद काय आहे ही आता या राज्याला कळाली आहे. डबल इंजिनचे हे सरकार वेगाने धावतय म्हणून आपल्याला विकास दिसत आहे.

Development Fund : विकास निधीवरून मंत्री कपिल पाटील आणि खासदार डॉ. शिंदे यांची जोरदार टोलेबाजी

डोंबिवली - केंद्र व राज्य मिळून डबल इंजिनचे सरकार आले आहे. त्याची ताकद काय आहे ही आता या राज्याला कळाली आहे. डबल इंजिनचे हे सरकार वेगाने धावतय म्हणून आपल्याला विकास दिसत आहे. यापुढेही विकास दिसेल मुंबईसह एमएमआर रिजन मधील ठाणे, कल्याण डोंबिवली यांसह सर्व महापालिकांचे डब्बे जोडले जातील आणि ही विकासाची एक्सप्रेस आणखी तुफान वेगाने धावेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण येथे व्यक्त केला.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील विविध उपक्रमांचे लोकार्पण बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रीय पंचायत राज राज्य मंत्री कपिल पाटील, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार गणपत गायकवाड, विश्वनाथ भोईर, ज्ञानेश्वर म्हात्रे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, आयुक्त भाऊसाहेब दांगडे,यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी कल्याण लोकसभा मतदार संघातील शेनाळे तलावाचे प्रबोधनकार ठाकरे सरोवर नामकरण, मल निस्सारण केंद्राचे उदघाटन, बीएसयूपी घरांच्या चावीचे वाटप मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, केंद्र व राज्य सरकार हे एका विचाराचे सरकार आहे. राज्याच्या विकासासाठी केंद्राकडे जे काही मागितले ते ते दिले गेले आहे. त्यामुळे हा विकास देखील आपल्याला दिसत आहे.

खड्डेमुक्त मुंबई याच्या धर्तीवर खड्डेमुक्त एमएमआर रिजन होईल. चांगले रस्ते या भागात येतील. या ठिकाणी रस्त्यांसाठी जो काही निधी लागेल तो देखील देईल. परंतु माझे ठाणे जिल्ह्यात येणं कमी झाले तर तुम्ही मला समजून घ्याल असे भावनिक आव्हान त्यांनी उपस्थित सर्वांना केले.

मुंबई, ठाणे प्रमाणे या एमएमआर रिजनला देखील सुविधा मिळाली पाहिजे त्या दृष्टीने काम करत आहोत. चांगले रस्ते, दिवाबत्ती हा लोकांचा अधिकार आहे असे ते म्हणाले. केंद्राचा अर्थसंकल्प समाजाभिमुख झाला असून, राज्याचा अर्थसंकल्प हा देखील सर्वसामान्य माणसाचं प्रतिबिंब त्यात दिसेल असाच असेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

कल्याण डोंबिवली मध्ये दोन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारा, त्यासाठी नगरविकास विभाग शासनाच्या मधण्यातून मदत केली जाईल अशी सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी आयुक्तांना यावेळी केली. एमएमआरडीएच्या माध्यमातून 410 कोटी काळू धरणासाठी दिले आहेत. तसेच केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून भिवंडीचा वऱ्हाळ तलावाचे देखील सुशोभिकरणं करण्यात येईल असे आश्वासन दिले.

खासदार डॉ. शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदार संघासाठी आणखी निधीची मागणी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली. तसेच मतदारसंघात येण्यासाठी विनंती केली असल्याचे सांगितले. यावर केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी खासदार शिंदे यांना टोला लगावत मुख्यमंत्री शिंदे यांना म्हणाले, एक चिंता वाटायला लागली आहे. खासदार सांगत होते साहेबांची वेळ मिळत नाही. डॉक्टर श्रीकांत शिंदेंना वेळ मिळत नाही तर आम्हाला कशी मिळेल याची चिंता मनाला लागली आहे. ग्रामीण भागातील मतदार संघासाठी आपला वेळ द्यावा जेणेकरून आमच्याकडे जे प्रकल्प आहेत त्या प्रकल्पांचे उद्घाटन आम्हाला करता येतील त्यासाठी निश्चितपणाने आपण आपला वेळ द्याल असे सांगितले.

यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी कपिल पाटील यांना उत्तर देताना सांगितले, ठाणे जिल्हा हा युतीचा बालेकिल्ला आहे. म्हणून तुम्ही मला मुभा दिली पाहिजे की मी बाहेर जाऊन कामावर लक्ष देऊ शकेल. ठाणे जिल्ह्यातील ही तटबंदी अभेद्य राखण्याचे काम तुम्ही केले पाहिजे असा सल्ला कपिल पाटील यांना देत कधी कधी मी येत जाईल अशी कोपरखळी देखील मारली.

कल्याण पश्चिमेला देखील निधी येऊ द्या....

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे मागणी करताना सांगितले, ठाणे जिल्ह्याचा मास्टर प्लॅन करा, आणि आमच्या एमएमआर रिजन मध्ये ती काम लवकरात कवकर करा. जेणेकरून नागरिकांचा प्रवास सुखकर होईल. कल्याण लोकसभा मतदार संघातील विकासकामांसाठी आणखी निधीची आवश्यकता आहे. असे खासदार शिंदे म्हणताच, कल्याण पश्चिमेला देखील निधी येऊ द्या अशी मागणी मंत्री कपिल पाटील यांनी केली. यावर खासदार शिंदे यांनी तुमच्या ही भागाला निधी मिळाला पाहिजे, मिळेल असे, कल्याण पश्चिमेत अनेक चांगले रस्ते व स्मार्ट सिटी ची कामे होत आहेत असे सांगितले.