विकासकामांच्या निधीवरुन दोन खासदारांची जुगलबंदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kapil patil and shrikant shinde

कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी नगरविकास विभागाकडून कोट्यावधींचा निधी मिळाला आहे.

MP Development Fund : विकासकामांच्या निधीवरुन दोन खासदारांची जुगलबंदी

डोंबिवली - कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी नगरविकास विभागाकडून कोट्यावधींचा निधी मिळाला आहे. यातील विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी कल्याणमध्ये उपस्थित होते. याप्रसंगी लोकसभा मतदार संघासाठी आलेल्या निधीवरून केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली. नगरविकास मंत्री असल्यापासून कल्याण लोकसभा मतदार संघासाठी निधी मंजुर होत आहे, परंतू भिवंडी मतदार संघास निधी मिळत नसल्याची खंत यावेळी खासदार पाटलांनी व्यक्त केली.

दरम्यान खासदार श्रीकांत यांनी ''पाटलांनी निधीसाठी थोडे सहकार्य करावे'' असे आवाहन केले होते. त्याला उत्तर देताना पाटलांनी शिंदे पिता पुत्रांना कोपरखळ्या मारल्या. श्रीकांत यांनी ''दररोज मुख्यमंत्र्यांच्या कानात सांगत राहीले तर कल्याण लोकसभा मतदारसंघ सोडून उर्वरीत ठाणे जिल्ह्यासाठी जास्तीचा निधी मिळेल'' असे त्यांनी सांगताच मंचावर एकच हशा पिकला. यासारख्या अनेक कोपरखळ्यांनी बुधवारचा लोकार्पण सोहळा गाजला.

कल्याण लोकसभा मतदार संघातील कल्याण व उल्हासनगर येथील विविध विकासकामांचे लोकार्पण बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार विश्वनाथ भोईर, गणपत गायकवाड, ज्ञानेश्वर म्हात्रे, जिल्हाधिकारी, आयुक्त यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान हा लोकार्पण सोहळा दोन खासदारांच्या तू तू मै मै ने जास्त गाजला. यापूर्वी कळवा मुंब्रा येथील विकासकामांच्या भूमिपूजन सोहळ्या प्रसंगी खासदार श्रीकांत शिंदे व कॉंग्रेस राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याचे पहायला मिळाले होते. त्यानंतर आता कल्याण लोकसभा मतदारसंघातील विकास कामांवरुन खासदार पाटील व शिंदे यांच्यात निधी मिळविण्यावरुन जुगलबंदी रंगल्याचे दिसून आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री होते तेव्हापासून कल्याण लोकसभा मतदार संघातील रस्त्यांची कामे असो किंवा तलाव, मंदिर यांचा पुर्नविकास यासाठी मोठ्या प्रमाणात निधी या मतदार संघासाठी आला आहे हे सर्वांनाच माहीत आहे. कल्याण मतदार संघासाठी आणलेल्या निधीचा पाढा खासदार शिंदे यांनी वाचून दाखवित मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे ''आमच्या अपेक्षा बंद होणार नाही'' असे सांगत विकासासाठी आणखी निधीची मागणी केली.

''ठाणे जिल्ह्याचा मास्टर प्लॅन करा. त्याप्रमाणे एमएमआर रीजनचीजी डेव्हलपमेंट आपल्याला करायची आहे ती करा जेणेकरुन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माणूस सहज पोहोचू शकतो. कल्याण पूर्वेची डेव्हलपमेंट होईल.'' असे खासदार शिंदे सांगत असतानाच मंचावर उपस्थित खासदार पाटील यांनी ''कल्याण पश्चिमसाठीही प्रयत्न करा'' असे सांगितले. त्यावर ''कल्याण पश्चिमेला देखील निधी मिळाला पाहीजे. याठिकाणी स्मार्ट सिटीची कामे सुरु आहेत. या भागातील रस्तेही चांगल्या स्थितीतील आहेत'' असे खासदार शिंदे यांनी आपल्या भाषणात सांगितले. तसेच मंत्री ''पाटलांनी थोडे आम्हाला सहकार्य केले पाहीजे. थोडा निधी तिकडेपण दिला पाहीजे'' अशी मिश्किल टिपण्णी केली.

खासदार शिंदे यांच्या या टिपण्णीला खासदार पाटलांनी उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे यांनाही काही कोपरखळ्या मारल्या. मुख्यमंत्री शिंदे यांच्या कामाचे कौतुक पाटलांनी यावेळी केले. ''गेल्या अडीच वर्षात घेतले गेले नाही ते निर्णय मुख्यमंत्र्यांनी सात महिन्यात घेत जनसामान्यांचा मुख्यमंत्री कसा असावा हे दाखवून दिले आहे.'' असे म्हणत नंतर त्यांनी आपला बाण मुख्यमंत्र्यांचे सुपूत्र शिंदे यांच्याकडे वळविला. ''श्रीकांत बोलतात सहकार्य आम्हाला करा, मुख्यमंत्री शिंदे व आमच ट्युनिंग पहिल्यापासून चांगलच आहे असे म्हणत.

आयुक्तांसोबत बैठक घेतल्यानंतर कल्याण पश्चिमेतील रस्त्यांच्या कामासाठी 500 कोटींची मागणी केली असल्याची आठवण त्यांनी यावेळी करुन दिली. हा निधी दिला तर पश्चिमेतील रस्ते डांबरी न रहाता सीमेंट कॉंक्रीटीकरणचे होतील'' असा टोमणा त्यांनी शिंदेंना लगावला. यावेळी मंचावर उपस्थित कल्याण पश्चिमेतील बाळासाहेबांच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांनी देखील कपिल पाटलांना पाठिंबा देत त्यांच्या हा मध्ये हा मिळविली. त्यावर पाटलांनी ''कल्याण पश्चिमेच्या जनतेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना विनंती करतो असे सांगत म्हणाले, मुख्यमंत्री पुढे जेव्हा केव्हा कल्याण डोंबिवलीत येतील तेव्हा त्यांनी रस्त्यांच्या कामासाठी 500 कोटी निधी दिला'' हे जाहीर करावे. यावर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

मनाला चिंता लागली आहे...

मुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नाही, त्यांना येथे येण्यासाठी वारंवार विनंती केली असे खासदार शिंदे यांनी म्हटले यावर खासदार पाटलांनी श्रीकांत यांना टोला लगावत मुख्यमंत्र्यांना म्हणाले, ''केंद्र राज्य सरकारच्या योजना मतदार संघात राबवून आपण अजून लोकांपर्यंत पोहोचावे त्यासाठी शुभेच्छा देतो पण एक चिंता मलाही वाटू लागली आहे. खासदार शिंदे सांगतात साहेबांची वेळ मिळत नाही. आता श्रीकांत यांना वेळ मिळत नाही तर आम्हाला कशी मिळेल याची चिंता मनाला लागली आहे.'' असे पाटील म्हणताच मुख्यमंत्री मिश्किल हसले. खासदार पाटील म्हणाले, ''ग्रामीण भागातील मतदार संघासाठी आपला वेळ द्यावा जेणेकरून आमच्याकडे जे प्रकल्प आहेत त्या प्रकल्पांचे उद्घाटन आम्हाला करता येतील त्यासाठी निश्चितपणाने आपण आपला वेळ द्याल.''

यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी कपिल पाटील यांना उत्तर देताना सांगितले, ''जनतेच्या आर्शिवादाने हा एकनाथ शिंदे राज्याचा मुख्यमंत्री झालाय. महाराष्ट्रात सगळीकडे फिरायला लागते म्हणून ठाण्याकडे कमी लक्ष जाते. ठाणे जिल्हा हा युतीचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे मला बाहेरच्या कार्यक्रमांना जायला मुभा दिली पाहीजे. तुम्ही सगळ्यांनी मिळून ठाणे जिल्हा हा आपला गड आहे. त्या गडाची तटबंदी अभेद्य राखण्याचे काम तुम्ही करायला पाहीजे'' असा सल्ला पाटलांना दिला. ''नाही कधी कधी मी येत जाईल'' असे पुढे म्हणताच हशा पिकला.

वेळ महाराष्ट्राला द्या, विकासाचा निधी द्या फक्त आम्हाला...

खासदार पाटलांनी मुख्यमंत्र्यांना यावरही उत्तर देणे काही सोडले नाही, पाटील म्हणाले, ''मुख्यमंत्री सांगतात ठाणे जिल्ह्यासाठी मला वेळ द्यायला मिळत नाही, महाराष्ट्रात वेळ द्यायचा आहे. आणि श्रीकांत शिंदे सांगतात की तिकडे निधी मिळाला इकडे थोडा कमी मिळाला आहे. आम्ही व्यासपीठावर बसलेले आपल्या सगळ्यांना शाश्वत करतो तुम्हाला जितका वेळ महाराष्ट्रासाठी द्यायचा द्या. पण विकासाचा निधी फक्त आमच्यासाठी द्या. ठाणे जिल्ह्याची आम्ही सगळे मिळून जबाबदारी घेतो. तुमच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यात तुम्हाला लक्ष घालावे लागणार नाही अशा प्रकारची परिस्थिती निश्चित पणाने विकासाच्या माध्यमातून करु असा विश्वास देतो'' असे सांगितले.

कल्याण लोकसभा सोडून इतर मतदार संघाला निधी द्या...

भिवंडीतील वऱ्हाळ तलावाचा खासदार पाटील यांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला. भगवा तलावापेक्षा मोठा तलाव भिवंडीतील वऱ्हाळ तलाव आहे. भगवा तलावाच्या धर्तीवर भिवंडीतील वऱ्हाळ तलावाचा केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून विकास झाला पाहीजे, जेणेकरून भिवंडीच्या सौंदर्यात भर पडेल. तुमच्या मार्गदर्शनाखालीच ठाण्याचा विकास होणार आहे असे पाटील म्हणाले. पाटलांच्या विनंत्या संपत नसल्याने यावेळी त्यांना भाषण उरकते घेण्याची सूचना करण्यात आली. त्यातही पाटलांनी शेवटची संधी काही सोडली नाही.

'श्रीकांत नेहमी माझी बाजू मांडत असतात की तुम्ही मंत्री झाल्यामुळे मागणी करता येत नाही. तेच माझ्या वतीने मागणी करतात. दोन्ही लोकसभा मतदार संघाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. घरातल्या घरात आहात आपण... थोडंस आमच्या विकासासाठी साहेबांच्या दररोज कानात जर सांगत राहीले तर जास्तीचा निधी कल्याण लोकसभा सोडून उर्वरीत ठाणे जिल्ह्यासाठी निश्चित मिळेल असा मला विश्वास आहे.'' असे म्हणत त्यांनी शिंदे पिता पुत्रांना चिमटा काढला.