आपत्कालीन परिस्थितीत एनडीआरएफच्या मदतीला आता आपदा मित्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NDRF team

तुर्की, सीरिया येथे ओढवलेली नैसर्गिक आपत्ती आपल्या इथे ओढवल्यास एनडिआरएफ टीम येईपर्यंत जखमींना तात्काळ मदत मिळावी यासाठी गावागावात आपदा मित्रांना प्रशिक्षण देत तयार करण्यात येत आहे.

Dombivali News : आपत्कालीन परिस्थितीत एनडीआरएफच्या मदतीला आता आपदा मित्र

डोंबिवली - तुर्की, सीरिया येथे ओढवलेली नैसर्गिक आपत्ती आपल्या इथे ओढवल्यास एनडिआरएफ टीम येईपर्यंत जखमींना तात्काळ मदत मिळावी यासाठी गावागावात आपदा मित्रांना प्रशिक्षण देत तयार करण्यात येत आहे. कल्याण येथील सुमारे 122 स्वयंसेवकांना बुधवारी काळा तलाव येथे हे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रशिक्षणामुळे लोकांना आपत्तीच्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आपदा मित्र आणि आपदा सखी रामदास सखी यांची मदत होणार आहे.

आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग मुंबई, एनडीएमए, एसडीएमए तसेच ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या वतीने आपदा मित्र प्रशिक्षण कल्याण काळा तलाव येथे देण्यात आले.

याअंतर्गत अग्निशमन दल, गर्दी व्यवस्थापन, बोट रेस्क्यू अशा विविध विषयावर प्रशिक्षण देण्यात आले आहे. कल्याण तालुक्यातील विविध भागांतील पोलीस पाटील, नागरी संरक्षण दल, होमगार्ड, एनसीसीचे विद्यार्थी यात सहभागी होते. राज्यातील 20 जिल्ह्यांमध्ये मध्ये हे प्रशिक्षण सुरू असून, ठाणे जिल्ह्यातून 500 स्वयंसेवकांना तर कल्याण मधून 122 विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण दिले जात असल्याचे स्वयंसेवक सुहास पवार यांनी सांगितले.

आपण पाहतो कधी आग लागते, कधी पूर येतो मग तेथे फक्त एनडिआरएफची टीम येणार का ? आपल्या जवळ आपदा मित्र सखी जर तयार असतील तर त्या त्या गावातील लोकांना आपत्तीच्या परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी ते तात्काळ मदत देतील. गावातील नागरिक ते जिथे रहात असतात त्या भागातील लहान मोठे रस्ते, गल्ल्या माहीत असतात. गावाची भौगोलिक परिस्थिती माहीत असते. या सर्वांची माहिती या आपदा मित्र, सखी यांना माहीत असेल तर त्याची गावकऱ्यांना व एनडीआरएफ च्या टीम ला देखील खूप मोठी मदत होऊ शकते असे यावेळी स्वयं सेवकांनी सांगितले.