
उकाड्यानंतर वीज गायब झाल्याने डोंबिवलीकर घामाघुम
डोंबिवली: उन्हाळा सुरु झाला की वीजेचा लंपडाव देखील सुरु होण्यास सुरुवात होते. डोंबिवलीतील रामनगर फिडरवर केबलमध्ये बिघाड झाल्याने सकाळी 7 वाजल्यापासूनच पूर्वेतील काही भागातील बत्ती गूल झाली आहे. याचा फटका सुमारे चार चे पाच हजार ग्राहकांना बसला असून आधीच उकाड्याने हैरान झालेले डोंबिवलीकर वीज गायब झाल्याने घामाघुम झाले आहेत. सहा तास उलटले तरी अद्यापही वीज पुरवठा सुरळीत सुरु झालेला नाही. दुसऱ्या केबलवरुन वीज पुरवठा फिरवून वीज पुरवठा सुरु करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी प्रयत्न करीत आहेत.
आधीच उष्म्याने हैराण झालेले डोंबिवलीकर गुरुवारी सकाळपासून वीज पुरवठा खंडीत झाल्याने गर्मीने घरात उकडून निघाले आहेत. डोंबिवली पूर्वेतील रामनगर, तुकाराम नगर, म्हात्रे नगर, आयरे गाव, स्टेशन परिसरातील वीज पुरवठा सकाळी 7 वाजल्यापासून खंडीत झाला आहे. कोरोना निर्बंध हटल्यानंतर शाळा, ऑफिस सुरु झाले आहेत. सकाळी शाळेत, ऑफिसमध्ये जाण्याची घाई त्यात लाईट गेल्याने अनेकांना त्याचा फटका बसला. गृहिणींची जेवण बनविण्याची घाई, कोणाची कपडे इस्त्री करण्याची घाई, कोणाचे ऑनलाईन सुरु असलेले काम या साऱ्यांचीच तारांबळ उडाल्याचे पहायला मिळाले. अर्धा एक तासाने लाईट येईल या आशेवर असणारे ग्राहक दुपारी 1 वाजला तरी लाईट न आल्याने कमालीचे त्रासले आहेत.
पावसाळा असो की उन्हाळा जेव्हा वीजेची जास्त गरज असते त्याच दरम्यान वीज पुरवठ्यात बिघाड होत असतात. वीज बिल वसुलीसाठी सक्ती करणाऱ्या महावितरणने या दिवसांत देखभाल दुरुस्तीकडे लक्ष देणे गरजेचे आहे अशी मागणी संतप्त ग्राहक करीत आहेत.
या परिसरातील बत्ती गुल
रामनगर, तुकारामनगर, म्हात्रे नगर, आयरे गाव, स्टेशन परिसर, टंडन रोड पथवरील ग्राहक रामनगर फेडरवरील केबलमध्ये बिघाड झाल्याने वीज पुरवठा खंडीत झाला आहे. केबल दुरुस्तीचे काम सुरु असून दुसऱ्या वाहिनीवरुन वीज पुरवठा फिरवून तासाभरात वीज पुरवठा सुरु करण्यात येईल.
धनराज बिक्कड, कार्यकारी अभियंता, महावितरण डोंबिवली
Web Title: Dombivali Sweats Due Power Outage
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..