Mumbai Crime 9 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करत गळा चिरुन हत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Mumbai Crime : 9 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करत गळा चिरुन हत्या

डोंबिवली : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत तिची निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याण पश्चिमेत घडली. सोसायटीच्या आवारात ही मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडली असल्याचे सकाळी एका नागरिकाने पाहील्यानंतर त्याने पोलिसांना यासंबंधी माहिती दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेत चौकशी सुरु केली आहे.

कल्याण डोंबिवली शहरात अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. वर्षभरापुर्वी 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल 34 जणांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती. त्यानंतर कल्याण पूर्वेतील 17 वर्षीय मुलीला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर सामुहिक अत्याचार करण्यात आला होता.

या छळाला कंटाळुन पिडीतीने आत्महत्या केल्यावर ही घटना उघडकीस आली होती. ही प्रकरण न्यायप्रविष्ट असताना कल्याण मध्ये गुरुवारी सकाळी उघडकीस आलेल्या घटनेने खळबळ माजली आहे. पश्चिमेतील रेल्वे स्थानक परिसराती एसटी आगाराच्या लगत असलेल्या एका सोसायटीच्या आवारात 9 वर्षीय मुलगी संशयास्पद अवस्थेत आढळून आली.

न्यू मोनिका सोसायटीमधील एक नागरिक सकाळी घराबाहेर पडला असता सोसायटीच्या आवारात पडलेली ही मुलगी त्याने पाहीली. रक्ताच्या थाऱोळ्यात मुलगी पडलेली असल्याने तसेच तिची अवस्था पहाता जागरुक नागरिकाने त्वरीत महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात संपर्क साधत याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पहाणी करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.

परिसरातील सीसीटिव्ही पाहिले असता तिच्यावर लैंगिक अत्याचार करत नंतर तिची हत्या करण्यात आल्याचे उघड झाले. पोलिसांनी तासाभरातच आरोपीची माहिती काढत त्याला स्टेशन परिसरातून ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरु असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक होणमाने यांनी दिली.

पीडित मुलीचे कुटुंब हे विठ्ठलवाडी परिसरात रहात आहे. भिक्षा मागून ते आपला उदरनिर्वाह करत असून भिक्षा मागून जेवण केल्यानंतर ते आसपासच्या परिसरातच रहात असल्याची माहिती समोर आली आहे. पंधरा वर्षीय मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे.