डोंबिवली : ‘सण उत्सवांवर वारेमाप खर्च... समस्या गेल्या वर्षी प्रमाणेच

थोडे लक्ष घालाल का नागरिकांची विचारणा
mumbai
mumbaisakal

डोंबिवली : ‘’गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही...’’ असेच काहीसे कल्याण डोंबिवली शहरातील समस्यांचे झाले आहे. मुलभूत समस्यांकडे नागरिकांचे फारसे लक्ष जाऊ नये म्हणून राजकीय पक्षांकडून विविध सण उत्सवांचे आयोजन केले जात आहे. गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सव सुरु झाला असून दांडिया उत्सव पक्षांकडून आयोजित केले गेले आहेत. यासाठी शहरातील मैदाने सज्ज झाली असून रस्त्यांवर बॅनरबाजी, कमानी, विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी उत्सवांवर बक्कळ पैसा राजकीय पक्षांकडून खर्च केला जात असताना, येथील समस्यांकडे थोडे पहाल का ? अशी विचारणा नागरीक करु लागले आहेत.

वाहन कोंडी, अरुंद रस्ते, खड्डे पडून रस्त्यांची झालेली चाळण, कचरा, प्रदूषण, पाणी टंचाई यांसारख्या समस्यांना गेले कित्येक वर्षे कल्याण डोंबिवलीकर तोंड देत आहेत. रस्त्यांच्या कामावरुन सध्या येथील राजकीय पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. आरोप प्रत्यारोप करण्यात जेवढे तात्पर्य दाखविले जात आहे, तेवढे तात्पर्य समस्या सोडविण्यासाठी मात्र कोणाकडून दाखविले जात नाही आहे. कोरोना मुक्ती नंतर शहरात सण उत्सव धूम धडाक्यात साजरी होऊ लागले आहेत. दहीहंडी, गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सव सुरु झाला आहे. यानिमित्त भव्य स्वरुपात गरब्याचे आयोजन पक्षांच्या वतीने करण्यात आले आहे. यावर लाखो रुपयांची उधळण करण्यात आली असल्याचे दिसते.

आपल्या पक्षाची ताकद दाखविण्यासाठी रस्त्यांवर मोठ मोठ्या कमानी बांधण्यात आल्या आहेत. बॅनरबाजी करण्यात आली आहे. या कमानी वाहतूकीला अडथळा ठरत आहेत, बॅनरबाजीमुळे शहर विद्रुप झाले आहे याकडे मात्र डोळे झाक केली जात आहे. नवरात्रोत्सवानंतर दिवाळी येईल राजकारणी प्रभागात उटणे, पणत्या, रांगोळी वाटतील आणि मतदारांना खूश करतील परंतू समस्या काही सुटणार नाहीत, या समस्यांकडेही थोडे लक्ष द्या अशी मागणी नागरिक करत आहेत.

भव्य उत्सव आयोजित करुन मतदारांना खूश करणे, राजकीय टोलवाटोलवी करुन मुख्य समस्येकडून त्यांचे लक्ष विचलित करणे असाच खेळ सध्या कल्याण डोंबिवलीत सर्व पक्षियांकडून सुरु असल्याचे दिसते. प्रशासकीय राजवट लागू असल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांवर तोफा डागत आपले हात वर करताना दिसतात. सण उत्सवांवर बक्कळ पैसा खर्च करण्याबरोबरच पायाभूत सुविधांकडेही लक्ष द्या अशी सूचना नागरिक करु पहात आहेत.

ज्येष्ठ दक्ष डोंबिवलीकर आणि विद्या निकेतन शाळेचे संस्थापक विवेक पंडीत याविषयी म्हणाले, वर्षानुवर्षे आपल्याकडे समस्या ह्या जशाच्या तशा आहेत. रस्त्यांवर खड्डे असणारच याची लोकांना एवढी सवय झाली आहे की, देवगडचा आंबा म्हणजे हापूस असा पेटेंड केला गेला तसाच डोंबिवली म्हणजे खड्डे असा पेटंट करायला हरकत नाही. शहरातील उत्सव, महोत्सव व अन्य कार्यक्रम हे लोकवर्गणी काढून किंवा स्थानिक पुढाऱ्याकडून निधी घेऊन केले जात असावेत. समस्या सोडविण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या समस्या काही या पारंपारिक धार्मिक पुजनाने नाहीशा होणाऱ्या नाहीत हे आपल्याला कधी उमजेल ? असा सवाल त्यांनी केला. 169 वर्षांपूर्वी, कार्ल मार्क्स ने "धर्म ही अफूची गोळी आहे"

असे विधान केले होते. आजही, सर्व साधारण माणूस सण, उत्सव यावर जेवढा फोकस करतो तेवढ्याच समस्या विसरतो. हाच फोकस जर प्रशासन आणि त्यांचा अनागोंदी कारभार यावर केला तर शहर सुधारु शकेल. आपल्याकडे, प्रशासनाला ' वठणीवर ' आणण्यासाठी मार्ग नाहीत असे नाही फक्त इच्छाशक्ती आणि ' वेळ ' नसतो. बहुतांश लोक हा नसणारा वेळ मॉल, विकेण्ड यामध्ये शोधतात. थोडक्यात डोंबिवली म्हणजे एक प्रकारे मोठी पेईंग गेस्ट टाईप वसाहत आहे आणि कोणालाही, शहराप्रती आपले काही उत्तरदायित्व आहे याची जाणीव नसल्याचे त्यांनी सांगितले. कल्याण डोंबिवली महापालिकेचे प्रशासकीय प्युरिफिकेशन होणे गरजेचे असून त्यासाठी अस्सल आणि अनुभवी आयएएस आयुक्त हवेत असे देखील ते म्हणाले.

उदय पेंडसे म्हणाले, सण, उत्सव काळात कमानींसाठी रस्ता खणला जातो, त्याची दुरुस्ती केली जात नाही. खड्ड्यांनी बकाल अवस्था आली असताना समस्यांकडे लक्ष देण्याऐवजी कार्यक्रम घेतले जातात. कामांना विलंब लावून निधी लाटण्यामागे सत्ताधारी, कंत्राटदार यांची मिलीभगत असते. हे सर्व काही जोपर्यंत थांबत नाही किंवा नागरिक आवाज उठवित नाहीत तोपर्यंत असेच सुरु राहणार. राजकारण्यांनी थोडा विचार करण्याची गरज आहे, अन्यथा येत्या काळात जनता नक्कीच त्यांचा विचार करेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com