डोंबिवलीत रंगणार ‘राजकीय गरबा’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

डोंबिवली - नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर आल्याने दांडिया आयोजकांचीही लगबग सुरू झाली आहे. यात राजकीय पक्षही कुठे मागे नसून डोंबवली शहरातही शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी व्यावसायिक दांडिया इव्हेंट ठेवला आहे. यंदा शिवसेनेतर्फे ‘डोंबवली रासरंग २०१७’ हा भव्यदिव्य दांडिया कार्यक्रम होणार आहे. याची माहिती गुरुवारी (ता.१४) पत्रकार परिषदेत देण्यात आली.    

डोंबिवली - नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर आल्याने दांडिया आयोजकांचीही लगबग सुरू झाली आहे. यात राजकीय पक्षही कुठे मागे नसून डोंबवली शहरातही शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी व्यावसायिक दांडिया इव्हेंट ठेवला आहे. यंदा शिवसेनेतर्फे ‘डोंबवली रासरंग २०१७’ हा भव्यदिव्य दांडिया कार्यक्रम होणार आहे. याची माहिती गुरुवारी (ता.१४) पत्रकार परिषदेत देण्यात आली.    

डोंबवलीतील तरुणाईला भव्यदिव्य दांडिया इव्हेंटचा आनंद लुटण्यासाठी ठाणे, मुंबई आदी शहरात जावे लागते. त्यामुळे या तरुणाईला शहरातच दांडिया उत्सवाचा मनमुराद आनंद लुटता यावा म्हणून शिवसेनेतर्फे २१ ते २९ सप्टेंबरदरम्यान  ‘डोंबिवली रासरंग २०१७’ कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या वेळी दिली. बिपीनचंद्र चुनावला यांच्या बॅंडसह पार्थ गांधी, सिद्धेश जाधव, निरंजना चंद्रा आणि दांडिया फेम मनीषा सावला यांच्या गाण्यांनी नवरात्रीचे नऊ दिवस विविध कार्यक्रम होतील. या कार्यक्रमात सांस्कृतिक वारसाही जतन केला जाणार आहे, अशी माहिती शिंदे यांनी दिली. या वेळी केडीएमसीचे महापौर राजेंद्र देवळेकर, आमदार सुभाष भोईर, सभागृहनेते राजेश मोरे, स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, डोंबिवली शहरप्रमुख भाऊसाहेब चौधरी, नगरसेवक दीपेश म्हात्रे आदी उपस्थित होते. 

‘डोंबिवली रासरंगची’ वैशिष्ट्ये 
नवदुर्गा पुरस्काराने नऊ विविध क्षेत्रातील स्त्रियांचा सत्कार 
स्त्रियांसाठी मराठमोळ्या संस्कृतीने बहरलेला ‘भोंडला’ खेळ
उत्कृष्ट दांडिया खेळणाऱ्यांना विशेष पारितोषिक
मराठी आणि गुजराती सेलिब्रेटींची विशेष उपस्थिती 

भाजपचे ‘नमो नमो नवरात्री’ 
एकीकडे शिवसेना दांडिया इव्हेंटमधून सांस्कृतिक आणि मराठमोळा वारसा जपत असताना दुसरीकडे भाजपने मात्र फक्त गुजराती प्रेमावरच अधिक भर दिल्याचे दिसते. शहरात ठिकठिकाणी भाजपचे फलक झळकत असून या दांडिया उत्सवालाही ‘नमो नमो नवरात्री’ असे नाव देण्यात आले असून स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांना वगळून मोदी आणि अमित शहा यांच्या फोटोंना अधिक प्राधान्य देण्यात आले आहे. पालिकेत एकत्र नांदणाऱ्या मित्रपक्षांनी ठेवलेल्या दोन भिन्न दांडिया कार्यक्रमांपैकी कोणता कार्यक्रम  अधिक गर्दी खेचतो, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. 

Web Title: dombivli news Garba