केडीएमटी बसअभावी नागरिकांना रिक्षांचा आधार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 मे 2018

डोंबिवली - कल्याण-डोंबिवली महापालिकेसाठी पांढरा हत्ती ठरलेल्या केडीएमटीच्या डोंबिवली पश्‍चिमेकडील विविध ठिकाणच्या सेवा बंद झाल्या आहेत. कमी प्रवासी संख्या आणि घटलेले उत्पन्न या कारणांमुळे या सेवा बंद करण्यात आल्या असल्याचे परिवहन प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे; मात्र, या सुविधांअभावी नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असून नाईलाजाने त्यांना रिक्षांचा आधार घ्यावा लागत आहे. काही महिन्यांपूर्वी कोपर ते कल्याण अशी बस सेवा सुरू करण्यात आली होती; मात्र ही सेवाही आता बंद झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. 

परिवहनचे तत्कालीन सभापती संजय पावशे यांनी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोपर ते कल्याण, अशी बस सेवा सुरू केली होती; मात्र ही बस सेवा आता बंद करण्यात आली आहे. तसेच स्थानक ते गरिबाचा वाडा, जुनी डोंबिवली ते आनंदनगर-दोन टाकी, फुले रोड ते स्थानक या सेवाही बंद झाल्या आहेत. केडीएमटीचा प्रवास सर्वसामान्य नागरिकांना परवडणारा असतो. या सेवांचा प्रारंभ जोरदार होतो; पण त्यानंतर या सर्व सेवा बारगळतात. नाईलाजाने नागरिकांना जादा पैसे भरून रिक्षाने प्रवास करावा लागत आहे. एकीकडे उत्पन्न कमी असल्याची बोंब परिवहन प्रशासनाकडून केली जाते; मात्र दुसरीकडे एकामागोमाग एक सेवा बंद केल्या जात असल्याने उत्पन्न वाढणार तरी कसे, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. परिवहन प्रशासनाने नेहमीप्रमाणे बसची कमी संख्या, नादुरुस्तीचे कारण पुढे केले आहे. 

नवीन बस लवकरच सुरू होतील. काही बस नादुरुस्त आहेत, तर सुमारे 65 ते 70 बस सध्या धावत आहेत. डोंबिवली पश्‍चिमेला सध्या स्थानक ते रेतीबंदर, अशी सेवा सुरू आहे. 
- देवीदास टेकाळे, परिवहन महाव्यवस्थापक, केडीएमटी. 

Web Title: Dombivli news KDMT BUS issue