मधुरांगणच्या अंगणी रंगली मंगळागौर

मधुरांगणच्या अंगणी रंगली मंगळागौर

डोंबिवली - हासरा, नाचरा सुंदर साजिरा श्रावण आला... याची प्रचीती येथील महिलांनी घेतली. निमित्त होते ‘सकाळ मधुरांगण’च्या ‘श्रावण आला’ या विविधरंगी कार्यक्रमाचे. श्रावण महिना खऱ्या अर्थाने विविध सणांबरोबरच वेगळा आनंद घेऊन येतो. विशेषतः महिलांसाठी तो खूपच खास असतो. उपास-तापासाबरोबच या महिन्यात महिलांचे अंतरंग खुलून निघते. कधी नागपंचमीचा उंच झोका काळजाचा ठोका चुकवतो; तर कधी मंगळागौरीचा खेळ पुन्हा माहेरच्या अंगणात घेऊन जातो. मग तिथे सुरू होणारा सासर-माहेरचा खट्याळ खेळ संपूच नये असे वाटते. हीच मंगळागौरीची मजा अनुभवण्याची संधी ‘सकाळ मधुरांगण’ने महिलांना दिली आणि त्यांनीही या संधीचे सोने करत मनसोक्त झिम्मा-फुगडीचा आनंद लुटला. केवळ पारंपरिक खेळ न खेळता मंगळागौरीतून सामाजिक संदेश देत जनजागृतीचाही प्रयत्न केला. खाद्यपदार्थ स्पर्धेत चवदार, चमचमीत आणि हट के उपवासाच्या खाद्यपदार्थांनी परीक्षकांसह उपस्थितांनाही खूश करून टाकले.

महिलांचे हक्काचे व्यासपीठ असणाऱ्या मधुरांगणने त्यांना माहेरची कमी भासू न देता खास त्यांच्यासाठी ठेवलेल्या मंगळागौरीसाठी सभासदांसह अन्य महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. श्रावणानिमित्त खास ठेवण्यात आलेल्या उपवासाचे पदार्थ बनवण्याच्या स्पर्धेतही सुगरणींनी उत्साहाने सहभाग घेतला. चटपटीत टिक्की चाट करून... त्यांनी स्पर्धेत बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला; तर ‘चटपटीत कोन विथ स्मुदी’ या उमा सव्वाखंडे यांच्या पदार्थाला द्वितीय, नीलिमा चित्रे यांच्या ‘उपवासाची बर्फी’ला तृतीय क्रमांक देण्यात आला. याशिवाय उपवासाचा केक, थालीपीठ, मोहनथाळ, उपवासाचे अनारसे, बालूशाही, खांडवी अशा अनेक नावीन्यपूर्ण पदार्थांची चव आणि मांडणी पाहून उपस्थितांनाही ते पदार्थ चाखण्यासह करण्याचा मोह झाला. काहींनी पदार्थांची कृती लिहून घेतली, तर काहींनी तिचे फोटो काढून घेतले. प्राची गडकरी आणि मेघना राजे यांनी स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले. त्यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.

बदलापूरच्या गुरुमाऊली कृपा ग्रुपच्या १५ सदस्यांनी नऊवारी साड्या, नाकात नथ अशा पारंपरिक मराठमोळ्या वेशभूषेत तालबद्ध आणि सुरेल मंगळागौर सादर केली. त्यांनी नृत्य आणि विविध खेळांतून कार्यक्रमात रंगत आणली.

जयदेवी मंगळागौरी या गाण्याने सुरू झालेल्या मंगळागौरीत जागरण, फेर, झिम्मा-फुगड्यांचे विविध प्रकार, गवळण, घागर फुंकणे, गोफ विणणे या खेळांना महिलांनी डोक्‍यावर घेतले. पारंपरिक आणि अधुनिकतेची सांगड घालत महिलांनी ‘पाणी वाचवा’, ‘झाडे लावा झाडे जगवा’, ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’, ‘पर्यावरण रक्षण’, स्त्रीचे आरोग्य, प्रदूषण अशा अनेक सामाजिक प्रश्‍नांवर गाण्यांमधून प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला.

कार्यक्रमात उपस्थित सर्वांना रामकृष्ण बाजारचे विशाल बोडके यांच्यातर्फे खास ‘मेड इन डोंबिवली’च्या शाकाहारी, मांसाहारी पाककृतीत वापरता येणाऱ्या आगरी मसाल्याचे सॅम्पल देण्यात आले. कार्यक्रमासाठी भारतीय आयुर्विमा महामंडळच्या विस्तार अधिकारी सरिता वेलापुरे, श्री स्वामी समर्थ पैठणी केंद्राच्या राजश्री जोशी, डायमेन्शन ॲड.च्या वीणा बेडेकर, रामकृष्ण बाझार, डोंबिवलीतील महिलांची महिलांसाठी असलेली कांचनगौरी महिला सहकारी पतपेढी, नगरसेवक महेश पाटील यांचे कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले. धनश्री गंधे यांनी निवेदन; तर मधुरांगणचे मुंबई प्रमुख आशिष कांदे, डोंबिवली ते बदलापूरच्या समन्वयक योगीता नागरे यांनी संयोजन केले.

महिलांनी मंगळागौरीतून समाज प्रबोधनाचे चांगले कार्य केले आहे. महापालिकेतर्फे आम्हीही प्लास्टिक बंदी, कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता मोहीम राबवत आहोत. महिलांनी याची सुरुवात स्वतःच्या घरापासून केल्यास यास निश्‍चितच बळ मिळेल. सर्वांनी प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर बंद करावा. घरातच ओला आणि सुका कचरा वेगळा करावा.
- महेश पाटील, भाजप नगरसेवक व कल्याण ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष

तुम्हीही व्हा  मधुरांगणच्या सदस्य
महिलांचे हक्कांचे आणि आवडते व्यासपीठ असणाऱ्या मधुरांगण परिवारातील एक घटक होण्याची नामी संधी पुन्हा एकदा दिली जाणार आहे. ज्या महिला अद्याप सभासद झालेल्या नाहीत त्यांनी मधुरांगणच्या डोंबिवली विभागातील योगिता नागरे -  ९६९९९७७३१७ यांच्याशी संपर्क साधावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com