मकर संक्रांत, दिनमान वाढण्याचा दिवस!

मकर संक्रांत, दिनमान वाढण्याचा दिवस!

डोंबिवली - मकर संक्रांतीचा सण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असल्याने सर्वत्र लगबग सुरू झाली आहे; मात्र जनमानसात संक्रांतीच्या सणाबद्दल अनेक अंधश्रद्धा असून त्या चुकीच्या आहेत, असे मत प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ दा. कृ. सोमण यांनी व्यक्त केले. मकर संक्रांत म्हणजे दिनमान वाढण्याचा दिवस. वर्षभरात ज्यांच्याशी मतभेद किंवा भांडण झाले असेल, त्यांना या दिवशी तिळगूळ देऊन गोड बोलण्यासंबंधी सांगितले जाते. मकर संक्रांती पुण्यकाळात गरिबांना, गरजू लोकांना दान देण्यास सांगण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले. 

संक्रांतीच्या दिवशी वाईट होते किंवा या दिवशी दान मागून त्या पैशाने देवाला काही तरी वस्तू अर्पण करणे गरजेचे आहे, अशा काही थोतांड कल्पना प्रचलित आहेत. हे सर्व खोटे असून अंधश्रद्धा आहे. २१ डिसेंबरला सूर्य सायन राशीत प्रवेश करतो त्या दिवसापासून दिनमान वाढतो आणि १४ आणि १५ जानेवारीला ते आपल्याला जाणवायला लागते. दिनमान वाढल्याने कोणाचे काय नुकसान होणार, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. तीळ हे गरम आणि औषेधी असल्याने संक्रांतीच्या दिवशी तीळ खाल्ले जातात. या दिवसांत थंडी असते. काळे कपडे उब देतात, म्हणून या दिवशी काळे कपडे घातले जातात.  

यंदा रविवारी (ता.१४) दुपारी १ वाजून ४६ मिनिटांनी सूर्य निरयन मकर राशीत प्रवेश करीत आहे. या मकर संक्रांतीचा पुण्यकाळ त्याच दिवशी दुपारी १.४६ पासून सूर्यास्तापर्यंत आहे. मकर संक्रांतीचा आणि १४ जानेवारीचा तसा काहीही संबंध नाही. २०८५ पर्यंत मकर संक्रांती कधी १४, तर कधी १५ जानेवारीला येणार आहे.  २१०० पासून निरयन मकर संक्रांती १६ जानेवारीला येणार आहे. ३२४६ मध्ये निरयन मकर संक्रांती १ फेब्रुवारीला येणार आहे, अशी माहितीही सोमण यांनी दिली. 

 पतंग उडवून स्वागत 
पतंग उडवून दिनमान वाढत जाण्याचे स्वागत केले जाते; मात्र आकाश हे पक्ष्यांचेही असते, ही गोष्ट लक्षात घ्यावी. धारदार मांज्याचा वापर टाळावा, असे आवाहन पक्षिमित्रांनी केले आहे. गुजरात अहमदाबादमधून या दिवशी पतंग उडवण्याची प्रथा आली, तर उत्तर गोलार्धात हा आनंदाचा दिवस, कारण या दिवसानंतर दिनमान वाढते आणि या दिवसभरात त्यांना जास्त काम करायला मिळते. दक्षिण भागात या दिवशी पोंगल असतो. 

खेळ होतो तुमचा;  जीव जातो आमचा 
मकरसंक्रांतीचे वेध लागले, की आकाशात पतंग उडविण्यासाठी ठिकठिकाणी मुलांमध्ये स्पर्धा रंगते. पतंग उडवण्याचा मनमुराद आनंद लुटला जातो; मात्र या खेळात पक्ष्यांच्या जीवाशीही खेळ खेळला जातो. पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नायलॉनच्या मांज्यामध्ये अडकून अनेक पक्षी जखमी होत असल्याची खंत पक्षिप्रेमींनी व्यक्त केली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात नायलॉन मांज्याच्या विक्रीस बंदी आणावी आणि ज्या दुकानांत नायलॉनचा मांजा विकला जातो, अशा दुकानांवर कठोर कारवाई करावी, असे मत डोंबिवली येथील पक्षिप्रेमी नीलेश भणगे यांनी व्यक्त केले आहे. नायलॉनचा मांजा तुटत नसल्यामुळे उडणारे पक्षी त्यात अडकून पडतात आणि वेळेत त्यांची सुटका न केल्यास ते तडफडतात. सुती मांजाचा वापर पतंगप्रेमींनी करावा, असेही भणगे यांनी सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com