‘पालिका रुग्णालयात चांगल्या सुविधा द्या’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

डोंबिवली - महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात रुग्णांच्या जीवाशी चाललेला खेळ त्वरित थांबावा आणि चांगल्या आरोग्य सुविधा, उपचार देण्याची व्यवस्था करा; अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा छत्रपती युवा फ्रंटतर्फे सामाजिक कार्यकर्ते श्‍याम गौड यांनी महापालिकेला दिला आहे. 

कल्याण-डोंबिवलीत महापालिका रुग्णालयात सर्पदंशावर उपचार करण्यासाठी आवश्‍यक लस नसल्याने भारत केणे या चांगल्या सर्प प्राणीमित्राला प्राण गमवावे लागले. डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात कोणत्याही रुग्णास दाखल करून घेऊन उपचार न करता त्याला थेट ठाणे किंवा मुंबईला नेण्यास सांगितले जाते. यामुळे अनेकांना वेळेवर उपचार न मिळाल्याने प्राण गमवावे लागत आहेत. रुग्णालय योग्यप्रकारे चालवता येत नसेल तर ते सरकारकडे वर्ग करा, अशी मागणीही गौड यांनी केली आहे. पालिका रुग्णालयात सर्पदंशावर प्रभावी अशा औषधोपचाराची सोय होत नाही, तोपर्यंत डोंबिवलीतील सर्व सर्पमित्रांनी साप पकडण्याचे काम थांबविण्याचा इशारा दिला आहे. सर्पमित्रांमुळे दुर्मिळ सापांच्या जातींचे संरक्षण आणि संवर्धन होण्यास मदत होते. जीवाची जोखीम पत्करून पर्यावरण रक्षणासाठी झटून अनेक सर्पमित्र तयार करणाऱ्या भारत केणेसारख्या सर्पमित्रांना वेळेवर उपचार मिळणे गरजेचे आहे, यासाठी सरकारने याकडे लक्ष देऊन ठोस धोरण ठरवण्याची मागणी डोंबिवलीतील सर्व सर्पमित्रांनी सोशल मीडियावर केली आहे.

Web Title: dombivli news municipal hospital kdmc