डोंबिवलीचे नेटके संमेलन!

श्रीकांत सावंत - सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

पु. भा. भावे साहित्यनगरी, डोंबिवली - शहरातील संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलाच्या परिसरात उभारण्यात आलेल्या पु. भा. भावे साहित्यनगरीत रंगलेल्या संमेलनाचा रविवारी (ता. ५) समारोप झाला. तीन दिवसांचे हे संमेलन असले तरी तीन-चार महिन्यांपासून संमेलनाच्या नियोजनात आयोजक, प्रायोजक व स्वयंसेवकांचे हात राबत आहेत.

पु. भा. भावे साहित्यनगरी, डोंबिवली - शहरातील संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलाच्या परिसरात उभारण्यात आलेल्या पु. भा. भावे साहित्यनगरीत रंगलेल्या संमेलनाचा रविवारी (ता. ५) समारोप झाला. तीन दिवसांचे हे संमेलन असले तरी तीन-चार महिन्यांपासून संमेलनाच्या नियोजनात आयोजक, प्रायोजक व स्वयंसेवकांचे हात राबत आहेत. वेगवेगळ्या नियोजनापासून प्रत्यक्ष व्यवस्थेपर्यंत संमेलन नेटके करण्याचा प्रयत्न हजारो हात करत आहेत.प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर शहराला मिळालेला मान, नोटाबंदीमुळे निधी संकलनात आलेल्या अडचणी, राजकीय सहभागावरून झालेली टीका, स्वागतोत्सुक शहरातील परिस्थितीवरून साहित्यप्रेमींची नाराजी आदी वेगवेगळ्या वळणावरून जाणाऱ्या ९० व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची सुरुवात चांगलीच झाली. संमेलनानिमित्त झटणाऱ्या मंडळींच्या अपेक्षेप्रमाणे हे संमेलन होत आहे. शेवटच्या दिवशी डोंबिवलीतील रसिकांनी मोठा प्रतिसाद संमेलनास द्यावा, अशी अपेक्षा ही मंडळी करत आहेत. 

प्रत्येकाची उपस्थिती हवी!
शहरातील एका सामाजिक संस्थेने अत्यंत झोकून शहरातील वाचन संस्कृती वाढवण्यासाठी संमेलनाचा घाट घातला आहे. अत्यंत देखणे, शिस्तबद्ध आणि नियोजित संमेलन होत असताना डोंबिवलीतील प्रत्येक नागरिकाने या साहित्य सोहळ्यात सहभागी होण्याची गरज आहे. प्रत्येकाने इथे येऊन एक तरी पुस्तक खरेदी करावे आणि वाचन संस्कृती वाढवण्यासाठी हातभार लावावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 
- पुंडलीक पै, फ्रेंन्ड ग्रंथालय.

वाचन संस्कृतीचा प्रसार व्हावा...
डोंबिवलीतील संमेलनाच्या निमित्ताने भव्यदिव्य संमेलन तयार करण्याचे प्रयत्न सगळ्या आयोजकांकडून केले आहेत. मोठा प्रतिसाद या संमेलनाला लाभला असून नागरिकांनी येऊन या संमेलनाचा आस्वाद घ्यावा. या निमित्ताने वाचन संस्कृतीचा प्रसार व्हावा, असे आम्हाला वाटते. गेल्या अनेक दिवसांपासून नियोजन सुरू असून हे संमेलन येथील विद्यार्थ्यांना अगदी जवळून पाहता यावे, यासाठी आमचा प्रयत्न राहिला आहे. डोंबिवलीतील विद्यार्थ्यांना याचा चांगला अनुभव मिळत आहे.
-प्रवीण दुधे, ग्रंथदिंडी आयोजन समिती.

आता साहित्य रसिकांची जबाबदारी...
डोंबिवलीमध्ये साहित्य संमेलन होतेय, याचा खरंच अभिमान वाटत असून आमच्या घरातील महत्त्वाचे कार्य असल्याप्रमाणे संपूर्ण संयोजन टीमने काम केले आहे. तयारी पूर्ण झाली असून आता साहित्य रसिकांची जबाबदारी असून त्यांनी संमेलनासाठी दाखल होण्याची गरज आहे. डोंबिवलीतील सगळ्या कलाकारांनी एकत्र येऊन संमेलनगीत तयार केले. या गीताला गेल्या तीन दिवसांपासून खूप चांगला प्रतिसाद मिळत असून एक चांगले कार्य आमच्या हातून घडल्याचा आनंद मिळत आहे. हे संमेलनगीत मराठीचा गोडवा जगभरात पोहचवण्यासाठी उपयुक्त ठरो, असे मला वाटते. 
-सुखदा भावे, संमेलनगीत संगीतकार.

मराठीची सेवा करण्याची संधी...
साहित्य संमेलनाच्या उपक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली म्हणून आनंद वाटत आहे. संमेलनाची तयारी, पूर्व रंग आणि संमेलनाचा आनंदही या निमित्ताने घेत आहोत. मराठी साहित्य संमेलनाच्या गीताच्या निर्मितीमध्ये माझा सहभाग होता आणि या माध्यमातून मराठीचा गोडवा गाण्याची संधी आम्हाला मिळाली. मराठी साहित्याची सेवा करण्याचे हे एकमेव व्यासपीठ आहे. ही संधी मला मिळाली, यातून धन्य झाल्यासारखे वाटते.
- हृषिकेश अभ्यंकर, स्वयंसेवक.

Web Title: dombivli sammelan