डोंबिवली सोशिक शहर!

विद्यानिकेतन शाळेने बसच्या पाठीमागे लावलेले डोंबिवली सोशिक शहराचे फलक.
विद्यानिकेतन शाळेने बसच्या पाठीमागे लावलेले डोंबिवली सोशिक शहराचे फलक.

कल्याण : विविध समस्यांनी ग्रासलेले डोंबिवली सोशिक शहर असल्याचे शहरातील विद्यानिकेतन शाळेने जाहीर केले आहे. विविध डे साजरे केले जात असताना ‘वर्ल्ड टॉलरन्स डे’च्या निमित्ताने उपरोधिकपणे या शहरातील नागरिकांच्या सोशिकपणाचे कौतुक केले आहे. तसेच शाळेने डोंबिवली सोशिक शहर असल्याबद्दल हे बक्षीस जाहीर करत असल्याचे स्पष्ट करत तशा आशयाचे फलक लावले आहेत. 

मागील अनेक वर्षे कल्याण डोंबिवली शहरातील नागरिक येथील समस्यांमुळे हैराण आहेत. सध्या शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे नागरिकांचे कंबरडे मोडत आहेत. समाज माध्यमांवरूनही पालिकेतील सत्ताधाऱ्यांवर ताशेरे ओढले जात असताना सिनेसृष्टीतूनही डोंबिवलीतील खड्डे, रस्ते, वाहतूक कोंडीवरून पालिकेवर निशाणा साधला जात आहे.

पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनीही एका कार्यक्रमादरम्यान साठ वर्षांपूर्वी डोंबिवलीतील रस्त्यांची जी स्थिती होती त्यापेक्षाही दयनीय अवस्था आज आहे, असे ताशेरे ओढले होते. अभिनेते प्रशांत दामले यांनी ‘कल्याणचे नाट्यरसिक उत्तम, मात्र रस्ते थर्डक्‍लास’ अशा आशयाची फेसबुक पोस्ट केल्याने पालिकेचे वाभाडे निघाले आहेत. 

पालिका प्रशासन समस्यांकडे करत असलेले दुर्लक्ष आणि लोकप्रतिनिधींना येत असलेले अपयश यामुळे नागरिकांना कोणीही वाली राहिलेला नाही. खड्ड्यांबरोबरच विजेचा लपंडाव, अपुरा पाणीपुरवठा यांसारख्या समस्याही येथे नागरिकांना बेजार करतात. सर्व गोष्टी सहन करत लोकप्रतिनिधी असलेली लोकशाही या शहरवासीयांनी अधिक बळकट केली आहे. म्हणूनच ‘वर्ल्ड टॉलरन्स डे’च्या निमित्ताने या शहराला सोशिक शहर या पुरस्काराने सन्मानित केले आहे. 

‘सोशिक शहर’ हा पुरस्कार कोणत्याही संस्थेने दिलेला नाही. या शहरातील नागरिकांनी आपली पाठ आपणच थोपटून घेतली पाहिजे, अशी भूमिका हे फलक लावण्यामागे आहे.
- विवेक पंडित, विद्यानिकेतन शाळा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com