दहावीचे ओझे घेऊ नका!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जुलै 2019

दहावीचे ओझे मनावर ठेवून व अभ्यासाचा बाऊ न करता; वाचन व सराव या दोन गोष्टींवर भर देत विद्यार्थ्यांनी दहावीचे आव्हान स्वीकारायला हवे, असे मत इंग्रजी व गणित विषयातील तज्ज्ञ शिक्षक रत्नाकर तांडेल यांनी ‘सकाळ’ वृत्तसमूहातर्फे आययोजित मार्गदर्शनपर शिबिरात व्यक्त केले.

मुंबई : दहावीचे ओझे मनावर ठेवून व अभ्यासाचा बाऊ न करता; वाचन व सराव या दोन गोष्टींवर भर देत विद्यार्थ्यांनी दहावीचे आव्हान स्वीकारायला हवे, असे मत इंग्रजी व गणित विषयातील तज्ज्ञ शिक्षक रत्नाकर तांडेल यांनी व्यक्त केले. बेलापूर येथील भारती विद्यापीठ प्रशाला व ज्युनिअर कॉलेज येथे दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता ‘सकाळ’ वृत्तसमूहातर्फे मार्गदर्शनपर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. 

विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी आणि गणित विषयाची अधिक भीती असते; मात्र या विषयांचा अभ्यासही खेळीमेळीने कसा करता येईल, याचे सूत्र रत्नाकर तांडेल यांनी या वेळी विद्यार्थ्यांना सांगितले. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी प्रथम वैमानिकाचे उदाहरण देताना त्यांनी वैमानिकाला जसे त्याच्या सहकार्याच्या मदतीने उड्डाण कधी करायचे आणि ’लॅंडिंग’ कुठे करायचे हे माहीत असते; तसेच विद्यार्थ्यांसमोरही त्यांचे ध्येय स्पष्ट असायला हवे. शिक्षक, पालक यांच्या मदतीने विद्यार्थ्यांनी त्यांच्या ‘स्मार्ट गोल’पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायला हवा. याशिवाय प्रतिकूल परिस्थितीतूनच यशाचा मार्ग असल्याचे सांगताना त्यांनी प्रसिद्ध अभिनेत्री सुधा चंद्रन, अपंगत्वावर मात करत ऑलम्पिकपर्यंतचा प्रवास करणारी विल्मा रुडोल्फ, ‘ॲपल’चे निर्माते स्टीव्ह जॉब्स, माजी राष्ट्रपती भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम यांची उदाहरणे दिली. 

इंग्रजीविषयी मार्गदर्शन करताना तांडेल यांनी सांगितले की, लिखाण आणि वाचन या दोन गोष्टींवर भर द्यायला हवा. रोज इंग्रजीचा एक पाठ वाचायलाच हवा. छोटी-छोटी वाक्‍ये तयार करण्याबरोबरच फावल्या वेळात एकमेकांशी इंग्रजीत संवाद साधल्याने या विषयात आवड निर्माण होईल. इंग्रजी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप स्पष्ट करत प्रश्नपत्रिकेतील प्रश्न कोणत्या क्रमाने आणि कशा प्रकारे हाताळावेत, हेदेखील त्यांनी स्पष्ट केले. गणित विषय हा स्कोअरिंगचा विषय आहे. मात्र, या विषयातील गुणांची टक्केवारी घसरत आहे, असे त्यांनी नमूद केले. 

गेल्या वर्षी दोन प्रकरणांचा मिळून एक असे दोन प्रश्न विचारण्यात आले होते. त्यामुळे मुलांचा गोंधळ झाला होता. जास्तीत जास्त सराव केल्यास अशा प्रश्नांमुळे गोंधळ होणार नाही, असेही त्यांनी या वेळी विद्यार्थ्यांना सांगितले. या कार्यक्रमाला प्राचार्य मंदाकिनी कासारे, शिक्षिका अनिता कासारे, अनिल तांबिले, नरेश लोहार, ‘सकाळ’ वृत्तसमूह वितरण विभागाचे अतुल शेगावकर, खानदेश मित्र मंडळाचे अध्यक्ष, महाराष्ट्र कलाशिक्षक संघटनेचे अध्यक्ष हिरामण पाटील उपस्थित होते.

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘सकाळ’ वृत्तपत्राने मार्गर्शनपर व्याख्यान आयोजित केल्याबद्दल त्यांचे आभार. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. या उपक्रमातून नक्कीच विद्यार्थ्यांना लाभ मिळेल, याची मला खात्री आहे. 
- मंदाकिनी कासारे, प्राचार्य.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Don't take the ssc board exam burden!