ठाणे शहरातील कोंडीवर 'दुहेरी' वाहतुकीचा उतारा

ठाणे शहरातील कोंडीवर 'दुहेरी' वाहतुकीचा उतारा

ठाणे : वाढते नागरीकरण आणि वाहने यांसह येनकेनप्रकारे ठाणे शहरात वाहतूक कोंडी होत असते. तेव्हा, ठाण्याच्या कोंडीवर "दुहेरी' वाहतुकीचा उतारा ठाणे पालिका प्रशासन आणि वाहतूक शाखेने शोधला आहे. शहरांतर्गत उभारण्यात आलेल्या तीन उड्डाणपुलांपैकी मीनाताई ठाकरे चौक उड्डाणपुलावरील वाहतूक दुहेरी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. या निर्णयामुळे खोपट, मीनाताई ठाकरे चौक आणि गोकुळनगर येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून वाहन चालकांना दिलासा मिळणार आहे. येत्या काही कालावधीत हा उड्डाणपूल दुहेरी वाहतुकीसाठी खुला केला जाण्याची शक्‍यता आहे. 

ठाणे शहरातील अंतर्गत मार्गावरील कोंडी टाळण्यासाठी एमएमआरडीए आणि ठाणे महापालिका यांच्या संयुक्त उपक्रमातून 221 कोटीचे संत नामदेव चौक नौपाडा, कॅसलमील येथे मीनाताई ठाकरे चौक आणि मखमली येथील अल्मेडा चौक या तीन उड्डाणपुलांची निर्मिती केली.

दीड वर्षांपूर्वी मखमली उड्डाणपुलाचे तर, 3 मार्च 2019 ला नौपाडा आणि मीनाताई ठाकरे उड्डाणपुलाचे लोकार्पण युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याहस्ते करण्यात आले. यातील तीन पेट्रोल पंप आणि नौपाडा येथील उड्डाणपूल हे दुहेरी बाजूने वाहतुकीसाठी खुले आहेत. तर मीनाताई ठाकरे उड्डाणपूल हा केवळ खोपट आणि कोर्टनाक्‍याच्या दिशेने येणाऱ्या वाहनांसाठी एकदिशा मार्गासाठी खुला करण्यात आला. 

परंतु, घोडबंदर किंवा माजीवड्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना मीनाताई ठाकरे चौकातील पुलाखालील रस्त्याचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे या उड्डाणपुलाचा काहीच उपयोग नसल्याची टीका वाहन चालकांकडून करण्यात येते. त्यातच याच मार्गावर एक पेट्रोल पंप असल्याने इंधन आणि सीएनजी गॅस भरण्यासाठी रिक्षा चालकांसह वाहनांची मोठी रांग लागलेली असते.

ही रांग रस्त्याचा अर्धा भाग व्यापत असल्याने दररोज वाहतूक कोंडी होत असते. पुढे कोलबाड सिग्नलमुळे आणि मीनाताई ठाकरे चौकातील पुलाखालील रस्त्याची अवस्थाही बिकट झाल्याने या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा फटका वाहन चालकांना सहन करावा लागत आहे. 

यावर उपाय म्हणून पालिकेने मीनाताई ठाकरे उड्डाणपूल हा मार्ग दुहेरी करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रस्तावाला ठाणे शहर वाहतूक शाखेने मंजुरी दिल्याने लवकरच हा मार्ग दुहेरी वाहतुकीसाठी खुला होऊन कोंडीची समस्या दूर होण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, पालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, कोंडी टाळण्यासाठी हा मार्ग दुहेरी केला जात असल्याबाबत त्यांनी दुजोरा दिला. 

प्रशासनाचा हिरवा कंदील 
दोन मार्गिकांचा हा उड्डाणपूल असून गोकुळनगर ते एलबीएस मार्गावरील खोपट, बाबुभाई पेट्रोल पंपपर्यंत जाणाऱ्या मार्गिकेची रुंदी 8.5 मीटर तर, लांबी 683 मीटर आहे. दुसरी मार्गिका मीनाताई ठाकरे चौक ते जेल तलाव येथे जात असून याची रुंदी 7 मीटर आणि लांबी 639 मीटर आहे. या उड्डाणपूलावरून सद्यस्थितीत एकेरी वाहतूक सुरू असून खोपट दिशेकडून दुहेरी मार्गिका करण्यास प्रशासनाने हिरवा कंदील दिला आहे. दरम्यान, कोर्टनाक्‍याच्या दिशेला उतरणारी मार्गिका दुहेरी केल्यास अपघाताची शक्‍यता निर्माण होणार असल्याने ही मार्गिका एकेरी वाहतुकीसाठीच सुरू ठेवण्यात येणार असल्याचे वाहतूक शाखेने स्पष्ट केले आहे. 

वाहतूक कोंडीचे प्रमाण घटले
तीन पेट्रोलपंप, वंदना थिएटर ते मखमली तलाव असा 636 मीटर लांबीच्या या उड्डाणपुलावरून दुहेरी वाहतूक सुरु असल्याने वाहतूक खोळंबण्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे. तर, संत नामदेव चौक उड्डाणपूल हा कोपरी, पूर्वद्रुतगती महामार्गालगत जुने टेलिफोन एक्‍सेंज ते नौपाड्यातील महात्मा गांधी मार्गापर्यंत जाणारा 8.5 मीटर रुंद आणि 647 मीटर लांबीचा पूल असून या पुलावरून देखील दुहेरी वाहतूक सुरू आहे. नौपाडा पोलिस ठाण्याकडे उतरणाऱ्या या पुलावरून पूर्वद्रुतगती महामार्गाच्या दिशेला वाहने हाकण्याची सुविधा उपलब्ध असल्याने शहरात वाहतूक कोंडीचे प्रमाण घटले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com