नवी मुंबईला चौथ्यांदा "डबल ए-प्लस' मानांकन 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 एप्रिल 2018

नवी मुंबई - चांगल्या महसुली वसुलीमुळे नवी मुंबई महापालिकेला "इंडिया रेटिंग ऍण्ड रिसर्च' या संस्थेने "डबल ए प्लस स्टेबल' हे पत मानांकन जाहीर केले आहे. त्यामुळे या आर्थिक वर्षातही पत राखण्यात पालिकेला यश मिळाले आहे. सलग चौथ्यांदा "डबल ए-प्लस' मानांकन मिळालेली देशातील ही एकमेव पालिका असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. 

यंदा आयुक्तांनी मांडलेल्या दोन हजार 987 कोटींच्या अर्थसंकल्पापैकी दोन हजार 950 कोटी जमा झाले असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था कर, उपकर, मालमत्ता कर, नगररचना कर, पाणीपुरवठा विभागाकडून मिळालेले एक हजार 962 कोटी यांचा त्यात समावेश आहे. यामुळे पालिकेची आर्थिक स्थिती भक्कम झाली आहे. सेवा व वस्तू कर हा पालिकेच्या मुख्य स्त्रोतांपैकी एक असून यातून महापालिकेला 2017-18 मध्ये एक हजार 195 कोटींचे अनुदान मिळाले होते. या वर्षी 537 कोटींचे अनुदान मिळाले आहे. नगररचना शुल्कपोटी शंभर आणि पाणीपट्टीतून 75 कोटी मिळाले आहेत. महापालिकेने राबवलेल्या विशेष मोहिमेमुळे थकीत मालमत्ता कर वसुलीत चांगले यश मिळाले आहेत. पालिकेच्या या भरीव कामगिरीमुळे 2016-17 मधील पालिकेच्या एक हजार 138 कोटींच्या उत्पन्नात 2017-18 मध्ये 125 कोटींनी वाढ झाली. त्यामुळे 2017-18 चे उत्पन्न एक हजार 962 कोटींवर केले आहे. यामुळे महापालिकेने यंदा मांडलेला अर्थसंकल्प वास्तववादी ठरला असून पालिकेच्या सक्षम आर्थिक स्थितीमुळे पालिकेला "डबल ए-प्लस' मानांकन मिळाले आहे. 

Web Title: Double A-Plus ranking for Navi Mumbai