खारघर टेकडीचे ८८ वर्षीय ‘गार्डियन’

खारघर टेकडीचे ८८ वर्षीय ‘गार्डियन’

बेलापूर -  पावसाळ्यामध्ये डोंगरकड्यांवर फुललेली हिरवळ अनुभवायला अनेक पर्यटक जातात; परंतु पाऊस नसताना ही हिरवळ आणि झाडे कोण जपते, याचा विचार कोणाच्या मनात येत नाही; पण आपल्यातलेच काही जण अविरत कष्ट करून प्राणपणाने हा निसर्गाचा ठेवा जपत असतात.यामध्ये नवी मुंबईतील डॉ. डी. एन. गंजू हे एक नाव.

चार वर्षांपासून रोज खुरपे व १० लिटर पाणी घेऊन हजार पायऱ्या चढत पारसिक टेकडी चढणारे व टेकडीवरील हजारहून अधिक झाडांची काळजी व मशागत करणारे ८८ वर्षीय डॉ. गंजू हे अनेकांचे प्रेरणास्थान ठरत आहेत. तरुणांनाही लाजवेल अशा उत्साहाने काम करणाऱ्या डॉ. गंजू याना खारघर टेकडीचे गार्डियन म्हणून संबोधले जाते.

खारघरमधील सेक्‍टर ३५ येथे राहणारे डॉ. गंजू निवृत्त प्राध्यापक आहेत. त्यांच्या इमारतीसमोरच खारघर मधील पारसिक हिल आहे. निसर्गाच्या जवळ राहता यावे म्हणून डॉ. गंजू येथे स्थायिक झाले; परंतु काही वर्षांपूर्वी उजाड दिसणाऱ्या पारसिक टेकडीला पुन्हा हिरवेगार कसे बनवावे, याबद्दल ते अनेक निसर्गप्रेमींसोबत चर्चा करायचे. त्या वेळी टेकडीवर फिरताना ज्योती नावाच्या महिलेला त्यांनी झाडांना पाणी घालताना बघितले. तिच्यापासून प्रेरणा घेऊन डॉ. गंजूंनी आपल्या कार्याला सुरुवात केली. डॉ. गंजू यांनी आतापर्यंत अनेक सेवाभावी संस्था आणि निसर्गप्रेमी नागरिकांना रोपलागवड व त्याची मशागत याविषयी मार्गदर्शनही केले आहे. निसर्गाबाबत आत्मियता असलेले  डॉ. गंजू यांचे निसर्गाशी सदैव नाते जडलेले आहे.

चार वर्षांत त्यांनी हजारहून अधिक विविध प्रकारची झाडे लावली व जगविली आहेत. टेकडीवर लागणाऱ्या आगीबद्दल तप्तरतेने मदत बोलावून त्यांनी टेकडीला अनेक वेळा वाचवले आहे. या प्रवासात अनेक निसर्गप्रेमी व संस्थांच्या मदतीने डॉ. गंजू यांनी मदर्स डे, फादर्स डे असे विविध डेज व समारंभ टेकडीवर रोपे लावून  साजरे केले.

या वयात बेडवर झोपून खोकत बसण्यापेक्षा निसर्गाच्या सान्निध्यात स्वच्छंदपणे फिरणे मला जास्त प्रिय आहे. आणि मी हे काम स्वतःसाठीच करत आहे. मी केलेल्या छोट्याशा कामाच्या बदल्यात निसर्ग मला भरभरून आरोग्य व मानसिक समाधान देत आहे.
- डॉ. डी. एन. गंजू, खारघर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com