100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जब्बार पटेल यांची निवड

100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जब्बार पटेल यांची निवड

मुंबई :  शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांची निवड करण्यात आली आहे. कार्यकारी समितीच्या बैठकीत डॉ. पटेल यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले, अशी माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी बुधवारी (ता. 20) दिली. 

शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ नाट्य-चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल व ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्या नावाचे अर्ज अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेकडे आले होते. नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज मागवण्यात आले होते. त्यानुसार मुलुंड, नागपूर येथील नाट्य परिषदेच्या शाखांसह इतर शाखांनी डॉ. जब्बार पटेल यांचे आणि पुणे, नाशिक, बीड या शाखांनी मोहन जोशी यांचे नाव नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेला सुचवले होते. 

मराठी नाट्य परिषदेच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत या दोन्ही नावांवर चर्चा करण्यात आली. त्यावेळी अध्यक्षपदासाठी डॉ. पटेल यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले. 15 डिसेंबरला होणाऱ्या नियामक मंडळाच्या बैठकीत डॉ. जब्बार पटेल यांची नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात येईल, असे नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी सांगितले. 

चौफेर कामगिरी 

जब्बार पटेल यांना वयाच्या दहाव्या वर्षापासून शाळेतील नाटकात काम करण्याची संधी मिळाली. पुढे सोलापूरमधील नाट्य क्षेत्रात मोठे नाव असलेले श्रीराम पुजारी यांच्या घरी राहून त्यांनी साहित्य, संगीत, नाटक या तिन्ही क्षेत्रांतील संचार सुरू ठेवला. पुण्यात बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातून शिक्षण घेताना जब्बार पटेल ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर यांना भेटले. त्यांनी तेंडुलकर यांच्या "अशी पाखरे येती' या नाटकाचे राज्य नाट्य स्पर्धेसाठी दिग्दर्शन केले. ते नाटक त्यावेळी खूप गाजले. त्यानंतर वेगळ्या चौकटीतील "घाशीराम कोतवाल' नाटकासह राजकारणावरील "सिंहासन' व "सामना'; तसेच "जैत रे जैत', "उंबरठा', "मुक्ता', "एक होता विदूषक' आदी चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले. डॉ. जब्बार पटेल पुण्याच्या एमआयटी विद्यापीठात नाट्य शाखेचे संचालक म्हणून काम पाहत आहेत.  

WebTitle : dr jabbar patel elected as president of hundredth akhil bharatiya natya sammelan

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com