शिवसेना-भाजपमध्ये नालेसफाईवरून "महाभारत' 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 मे 2017

मुंबई - नालेसफाईवरून चिखलफेक झाल्यानंतर आता शिवसेना-भाजपमध्ये महाभारतातील पात्रांवरून शाब्दिक चकमकी सुरू झाल्या आहेत. "बालिश बहु बायकांत बडबडला' अशी भाजपची अवस्था झाली असल्याचा चिमटा महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी काढला. त्याला प्रत्युत्तर देताना "करून दाखवलं' बोलणारे आता 100 टक्के गाळ साफ होणार नसल्याचे सांगत आहेत. त्यावरून महापौरांनी महाभारतातील कोणत्या पात्राशी स्वत:ची तुलना करावी हे ठरवावे, असा टोला भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी लगावला आहे. 

नालेसफाईवरून शिवसेना-भाजपमध्ये आधीच कलगीतुरा रंगला आहे. गाळ उचलण्यासाठी कंत्राटदारांना घातलेल्या अटी शिथिल करण्याच्या निर्णयाबाबतही भाजपने शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. त्याला सोमवारी महापौरांनी प्रत्युत्तर दिले. स्थायी समितीच्या बैठकीत गाळ उचलण्याचा प्रस्ताव मंजूर झाला, तेव्हा मुंबईचे पहारेकऱ्यांनी का विरोध केला नाही? नालेसफाईची जबाबदारी सहायक आयुक्तांची आहे, असे सांगताना महाभारतातील "उत्तरा' या पात्राची आठवण काढत "बालिश बहु बायकांत बडबडला' अशी परिस्थिती असल्याचा चिमटा महापौरांनी भाजपचे नाव न घेता काढला. 

शिवसेनेच्या या आरोपांना भाजपने तत्काळ प्रत्युत्तर दिले. अटी शिथिल केल्याबाबत स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनाला जाब विचारण्यात आला होता; मात्र मुंबईच्या दृष्टीने आवश्‍यक असल्याने या प्रस्तावाला पाठिंबा देण्यात आला. आमचा पहारा सुरूच आहे. "करून दाखवले' असे म्हणणारे आता 100 टक्के गाळ काढला जाणार नसल्याचे सांगतात. सात पम्पिंग स्टेशनचे काम झाले, तरी पाणी उपसणारे पंप रस्त्यावर का लावावे लागतात, असा प्रश्‍न विचारत आता महापौरांनी महाभारतातील कोणत्या पात्राशी स्वत:ची तुलना करावी हे स्वत:च ठरवावे, असा टोला कोटक यांनी लगावला. 

Web Title: Drain cleaning issue