भाजपची सेनेवर कुरघोडी

भाजपची सेनेवर कुरघोडी

मुंबई - लोकसभेचे मतदान संपताच गुरुवारी (ता. २) मुंबई भाजप अध्यक्ष आमदार ॲड. आशीष शेलार यांनी पश्‍चिम उपनगरातील गझदरबांध परिसरातील नालेसफाईची पाहणी केली. निवडणूक कामाचे कारण सांगून पालिका अधिकाऱ्यांनी नालेसफाईकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका त्यांनी ठेवला. कंत्राटदारांनी अद्याप कामाला वेगच दिलेला नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे. आता पहारेकरी असलेल्या भाजपला नालेसफाईच्या कामांबाबत पुन्हा जाग आली आहे. शिवसेनेआधी नालेसफाईच्या कामाची पाहणी करून भाजपने त्यांच्यावर एक प्रकारे कुरघोडीच केली. 

वांद्रे, खार, सांताक्रूझ, अंधेरी, जुहू आदी उपनगरांच्या पश्‍चिमेकडील भागात पावसाळी पाण्याचा निचरा जलद गतीने होण्यासाठी गझदरबांध परिसरातील नालेसफाईची कामे वेळीच पूर्ण होणे अपेक्षित असते. गझदरबांधमध्ये बांधण्यात येणाऱ्या पम्पिंग स्टेशनचे कामही पूर्ण होणे अपेक्षित आहे. कामांमध्ये दिरंगाई झाल्यास वांद्रे ते अंधेरीदरम्यानच्या नागरी भागासह पश्‍चिम रेल्वेला पुराचा फटका बसतो. धोका लक्षात घेऊन गुरुवारी आमदार ॲड. शेलार यांनी गझदरबांध परिसरातील चार प्रमुख नाल्यांच्या सफाईच्या आणि पम्पिंग स्टेशनच्या कामाची पाहणी केली. या वेळी महापालिका अधिकाऱ्यांसह भाजप नगरसेविका अलका केरकर, स्वप्ना म्हात्रे, हेतल गाला आणि पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

कामात पारदर्शकतेची गरज 
पीएनटी नाला बॉक्‍स, खार पहिला रस्ता नाला, शास्त्रीनगर नाला, कडेश्‍वरी नाला, रिलिफ रोड नाला आणि छोटी गटारे यांच्यातील गाळ काढण्यास अद्याप सुरुवातच झालेली नाही. संबंधित बाब अत्यंत चिंताजनक असल्याचे आशीष शेलार यांनी सांगितले. नालेसफाईच्या कामात पारदर्शकता असण्याची गरज आहे. मुंबई भाजपच्या सर्व नगरसेवकांना आपापल्या विभागातील कामांवर लक्ष देऊन एक अभियान म्हणून काम हाती घ्या, अशा सूचना तातडीने दिल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com