Mumbai News : मुंबईतील नालेसफाईच्या कामांना अखेर सुरुवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

drain cleaning

Mumbai News : मुंबईतील नालेसफाईच्या कामांना अखेर सुरुवात

मुंबई : दरवर्षी पावसाळापूर्व केल्या जाणाऱ्या नालेसफाईच्या कामांना अखेर सुरूवात झाली आहे. नालेसफाईच्या २७ कामांसाठी नुकतेच कार्यादेश देण्यात आले आहेत. या कामांसाठी कंत्राटदारांनी यंत्रसामुग्रीची पूर्वतयारी सुरू केली आहे. यंदा साडे दहा लाख मेट्रीक टन गाळ काढण्याचे उद्दीष्ट्य ठेवण्यात आले आहे. गाळ काढण्याच्या कामावर गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही देखरेख ठेवण्यासाठी यंत्रणा उभारली जाणार आहे.

दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नाले व नदीतील गाळ काढला जातो. संपूर्ण वर्षभरातील नालेसफाईपैकी ७५ टक्के गाळ हा पावसाळ्याआधी काढला जातो. तर १५ टक्के पावसाळ्यादरम्यान, तर १० टक्के पावसाळ्यानंतर काढला जातो. नालेसफाईची कामे दरवर्षी मार्च महिन्यापासून सुरू होतात. गेल्यावर्षी पालिकेची मुदत मार्चमध्ये संपली होती.

त्यामुळे नालेसफाईचे प्रस्ताव स्थायी समितीत मंजूरच होऊ न शकल्याने हे प्रस्ताव प्रशासकीय राजवटीत मंजूर होण्यास वेळ लागला. त्यामुळे मागील वर्षी अर्धा एप्रिल महिना संपला तरी नालेसफाईला सुरूवात झाली नव्हती.

त्यामुळे पालिकेने युद्धपातळीवर नालेसफाईची कामे हाती घेऊन ती पूर्ण करावी लागली होती. पालिका निवडणूक लांबल्याने पालिका अस्त्तित्वात आलेली नाही. त्यामुळे यंदाही प्रशासकीय राजवट असून नालेसफाईच्या कामांना निविदा मागवल्यानंतर रखडलेली प्रक्रिया आता पूर्ण झाली असून नुकतेच कंत्राटदारांना कार्यादेश देण्यात आले आहेत.

यंदाच्या पावसाळयासाठी पालिका प्रशासनाने नालेसफाईच्या कामासाठी २२६ कोटींची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. छोटे नाले, मोठे नाले, रस्त्याची कडेची पावसाळी गटारे व मिठी नदी यामधील गाळ काढण्याच्या एकूण ३१ कामांसाठी यावेळी निविदा मागवण्यात आल्या होत्या. त्यापैकी २७ कामे लवकरच सुरू होणार आहेत. मोठ्या नाल्यासाठी ९० कोटी, छोट्या नाल्यांसाठी ९० कोटी आणि मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी ४६ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

मोठ्या नाल्यातून जवळपास ४ लाख ६३ हजार मेट्रिक टन तसेच छोटे नाले व पावसाळी गटारे यातून ४ लाख २४ हजार मेट्रिक टन एवढा गाळ काढला जातो. एकूणच जवळपास साडे दहा लाख मेट्रिक टन गाळ काढून मुंबई बाहेरील क्षेपणभूमीवर नेण्याचे उद्दीष्ट्य ठेवण्यात आले आहे. त्यापैकी साडे सात लाख मेट्रीक टन गाळ पावसाळ्यापूर्वी ३१ मे पर्यंत काढण्यात येणार आहे.