गतिरोधकांमुळे वाहनचालकांची हाडे खिळखिळी!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

नवी मुंबईत रस्त्यांची झालेली दुर्दशा, त्यावर पडलेले खड्डे, गटारे, भूमिगत वीजवाहिनी घेण्यासाठी रस्ता खोदल्यामुळे पडलेले खड्डे; त्यातच महापालिकेकडून उंचचउंच गतिरोधक टाकण्यात आले आहेत. या गतिरोधकांमुळे महापालिका क्षेत्रातील नागरिकांची हाडे पुरती खिळखिळी होत असून, त्यांना वाहतूक कोंडीचा सामनादेखील करावा लागत आहे.

नवी मुंबई : नवी मुंबईत रस्त्यांची झालेली दुर्दशा, त्यावर पडलेले खड्डे, गटारे, भूमिगत वीजवाहिनी घेण्यासाठी रस्ता खोदल्यामुळे पडलेले खड्डे; त्यातच महापालिकेकडून उंचचउंच गतिरोधक टाकण्यात आले आहेत. या गतिरोधकांमुळे महापालिका क्षेत्रातील नागरिकांची हाडे पुरती खिळखिळी होत असून, त्यांना वाहतूक कोंडीचा सामनादेखील करावा लागत आहे. याशिवाय रस्त्यावर, एकमेकांना खेटून बांधल्या जाणाऱ्या गतिरोधकामुंळे वाहनचालकांना अपघातांचा देखील सामना करावा लागत आहे.

ठाणे-बेलापूर मार्गावर तुर्भे, तुर्भे पुलाखाली, दिघा, नवी मुुंबईच्या प्रवेशद्वार असणाऱ्या गणपती पाडा या ठिकाणी टाकण्यात आलेल्या गतिरोधकांमुळे अपघात होत असून, त्या ठिकाणी रिफ्लेक्‍टर बसवण्यात आलेले नाहीत. ऐरोली, दिवा, घणसोली, कोपरखैरणे, वाशी, सानपाडा, नेरूळ, बेलापूरसह एमआयडीसी परिसरातील अंतर्गत असणाऱ्या रस्त्यावरील काही गतिरोधकांवर सफेद रंगाचे पट्टे मारण्यात आले नसून, रात्रीच्या वेळी अपघात होऊन वाहने पडण्याच्या घटना घडत आहेत.

दुचाकी खड्ड्यात गेल्यामुळे पहिला हादरा पाठीच्या खालील भागात बसतो. तसेच अन्य स्नायूही दुखावतात. दुचाकींवर बसण्याची चुकीची पद्धतदेखील याला जबाबदार आहे. त्यामुळे खड्डेमय रस्त्यांवरून जाताना संथगतीने जाणे, ही काळजी दुचाकीस्वारांनी घ्यावी.
- डॉ. राहुल ठाकरे, अस्थिरोगतज्ज्ञ.

ठाणे-बेलापूर मार्गावर गतिरोधकांवर पावसाळ्यानंतर पांढरे पट्टे मारण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणचे गतिरोधक निखळले आहेत, ते तत्काळ काढून टाकण्यात येतील.
- संजय देसाई, कार्यकारी अभियंता, महापालिका.  

गतिरोधकांवर सफेद पट्टे नसल्यामुळे दुचाकी चालवत असताना गतिरोधकाचा अंदाज येत नाही. त्यामुळे गतिरोधकांवरून गाडी उंच उडून आदळण्याचा प्रकार घडतो. त्यामुळे अपघात होण्याची  शक्‍यता असते.
- राकेश मोकाशी, दुचाकी वाहनचालक.

गतिरोधक कसे असावेत?
गतिरोधकाची उंची दहा सेंटिमीटर, लांबी साडेतीन मीटर आणि वर्तुळाकार क्षेत्र सतरा मीटर असणे आवश्‍यक आहे. तसेच वाहनचालकांना गतिरोधक असल्याची सूचना मिळण्यासाठी चाळीस मीटर अंतरावर सूचनाफलक असावा, असा नियम आहे. गतिरोधक तयार करताना वाहतूक पोलिस आणि महापालिका प्रशासनाची परवानगी घेणे आवश्‍यक आहे. तसेच गतिरोधकावर थर्मोप्लॅस्टिक पेंटने तयार केलेल्या पट्ट्या असाव्यात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Driver's bones cramp due to speed breakers