...हा आराखडा म्हणजे ‘विध्वंस’, अस्तित्व नष्ट करण्याचा डाव

...हा आराखडा म्हणजे ‘विध्वंस’; अस्तित्व नष्ट करण्याचा डाव
...हा आराखडा म्हणजे ‘विध्वंस’; अस्तित्व नष्ट करण्याचा डाव

नवी मुंबई : खारफुटी, पाणथळ जमिनी आणि मिठागरे असल्याने उरण परिसर पर्यावरणाच्यादृष्टीने संवेदनशील समजला जातो. असे असतानाही द्रोणागिरी नोडसाठी सिडकोने नुकताच जाहीर केलेला विकास आराखडा म्हणजे विकास नसून पर्यावरणाचा विध्वंस असल्याचा दावा पर्यावरणप्रेमींनी केला आहे. सिडकोने जाहीर केलेल्या विकास आराखड्यात या परिसरातील हरित पट्ट्यांची मोजणीदेखील सेक्‍टर्समध्ये करण्यात आली आहे.  

सिडकोच्या या आराखड्यानुसार २ हजार ७०० हेक्‍टर इतक्‍या नवी मुंबई विशेष आर्थिक क्षेत्राच्या (एनएमएसईझेड) जवळपास निम्म्या क्षेत्राचा (१ हजार २५० हेकटर) विकास करण्यात येणार आहे. एनएमएसईझेडच्या कक्षा खारफुटी आणि पाणथळ क्षेत्रात विस्तारल्याचे आराखड्यात दिसून येते. तसेच या आराखड्यात पर्यावरण संवेदनशील क्षेत्राचा उल्लेखही आढळत नाही. या परिसरात मोठ्या प्रमाणावर खारफुटी आहेत. मात्र, या हरित पट्ट्याला सेक्‍टर्सचे क्रमांक दिले आहेत. नेचर कनेकटचे संचालक बी. एन. कुमार यांनी सांगितले की, जयकॉर्प इंडियाच्या संकेतस्थळावर रिलायन्स समूह (मुकेश अंबानी यांच्या अध्यक्षतेखाली), जय कॉर्प आणि सिडको यांनी एनएमएसईझेडकरता केलेल्या कराराची माहिती उपलब्ध आहे. २ हजार १८० कोटी रुपये इतकी प्रारंभिक रक्कम गुंतवून उपभाडेपट्टीवर एनएमएसईझेडअंतर्गत ४ हजार एकर भूभागाच्या विकासाकरिता सामंजस्य करार केल्याचे ७ मार्च २०१९ रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने जाहीर केले होते. 

एकवीरा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदकुमार पवार यांनी या विकास आराखड्याला ‘विध्वंस, विनाशाचा आराखडा म्हटले आहे.’ ते म्हणाले, रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी एनएमएसईझेड विरोधात या आधीच पागोटे आणि भेंडखळ या आताच्या द्रोणागिरी विकास योजनेचा भाग असलेल्या ठिकाणावरील खारफुटी नष्ट केल्याबद्दल एफआयआर दाखल केला आहे. 

सिडकोने उच्च न्यायालयाच्या आदेशांचे आणि किनारी नियमन क्षेत्र (सीआरझेड) नियमांचे उल्लंघन केले आहे. एनएमएसईझेडच्या विकासात इतर गावांसोबत पाणजे आणि भेंडखळ खाजण आणि खारफुटीचे साम्राज्य असणारे पागोटे गिळंकृत केले जाणार आहे.
- नंदकुमार पवार, अध्यक्ष, एकवीरा प्रतिष्ठान.

भरतीच्या वेळी खाडीचे पाणी पाणजे तलावात शिरते. आता त्याला धारण तलाव ठरविण्यात आले आहे. आणि विकास आराखड्यात चमत्कारिकरित्या खाडी गायब झाल्याचे दिसते. पर्यावरणाचा ऱ्हास करण्याचा विडा उचलल्याप्रमाणे सिडको काम करताना दिसते.
- बी. एन. कुमार, संचालक, नेचर कनेक्‍ट.

खारफुटी, पाणथळ भाग विकास क्षेत्र म्हणून दाखवू शकत नाही. सीआरझेड १ मध्ये बांधकाम, भराव करण्यास मज्जाव आहे. महाराष्ट्र सागरी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत हा विकास आराखडा नक्कीच फेटाळला जाईल, अन्यथा त्या विरोधात न्यायालयात जाऊ.
- डी. स्टॅलिन, सदस्य, पाणथळ व खारफुटी संरक्षण समिती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com