Mumbai Crime : पोलीस कारवाईत जप्त केलेले 1500 कोटींचे अमली पदार्थ नष्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Drugs worth 1500 crores seized by police is destroyed mumbai crime police

Mumbai Crime : पोलीस कारवाईत जप्त केलेले 1500 कोटींचे अमली पदार्थ नष्ट

मुंबई : अमली पदार्थ विरोधात कारवाईत जप्त केलेल्या 1500 कोटींहून अधिक किमतीचे अमली पदार्थ सीमाशुल्क विभागाने शुक्रवारी 26 मेला तांत्रिक प्रक्रियेद्वारे नष्ट केले. मुंबई सीमा शुल्क विभागातर्फे नवी मुंबईतील तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड या संस्थेत अंमली पदार्थांची विल्हेवाट लावण्यात आली.

नष्ट करण्यात आलेल्या अमली पदार्थामध्ये 9 किलो कोकेन आणि 198 किलो मेथॅम्फेटामाइन यांचा समावेश आहे, हे अमली पदार्थ ऑक्टोबर 2022 मध्ये वाशी, नवी मुंबईतून महसूल गुप्तचर संचालनालयाने केलेल्या कारवाईत जप्त केले होते. कोकेन आणि मेथॅम्फेटामाइनची ही सर्वात मोठी जप्ती होती. अवैध ड्रग मार्केटमध्ये 1476 कोटी रुपये एवढी अमली पदार्थांची किंमत आहे. रासायनिक प्रक्रियेत मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात जप्त करण्यात आलेले एमडीएमए, मँड्राक्स आणि गांजा या सारखे अमली नष्ट करण्यात आले.

अंमली पदार्थांचा गैरवापर आणि अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी मुंबई पोलीस आणि अंमली पदार्थ विरोधी कक्ष शहरात विशेष मोहीम राबवत आहे. मुंबईतील अंमली पदार्थ तस्करीच्या विरोधात कारवाईचा एक भाग म्हणून ही कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांकडून सुरू असलेल्या अमली पदार्थ विरोधी मोहिमेत 24 एप्रिलपासून आता पर्यंतच्या कारवाईत पश्चिम मुंबईत 16 गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

या 16 गुन्ह्यापौकी 4 गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखेकडून करण्यात येणार आहे तर बाकी 12 प्रकरणांचा स्थानिक पोलीस तपास करणार आहेत. 26 एप्रिल पासून सुरू झालेल्या या मोहिमे अंतर्गत आतापर्यंत 23 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 3 कोटी रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. पश्चिम मुंबईत केलेल्या कारवाईत आता पर्यंत कोकेन - 9.3ग्रॅम, चरस - 108.15ग्रॅम, एम.डी.- 787.61 ग्रॅम, गांजा- 2 किलो 462 ग्रॅम असे विविध अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेले आहे.