मद्यपींचा रुग्णालयात राडा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जानेवारी 2017

मुंबई - जुहू येथील तळीरामांच्या दोन गटांनी नववर्षाच्या पहाटेलाच कूपर रुग्णालयात हाणामारी केली; त्यात रुग्णालयाचा सुरक्षारक्षक जखमी झाला. 

मुंबई - जुहू येथील तळीरामांच्या दोन गटांनी नववर्षाच्या पहाटेलाच कूपर रुग्णालयात हाणामारी केली; त्यात रुग्णालयाचा सुरक्षारक्षक जखमी झाला. 

जुहू परिसरातील नेहरूनगर झोपडपट्टीत काही जण दारू पीत बसले होते. मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास त्यांच्यात वाद झाला. त्यातील एकाने दारूची बाटली फेकल्याने एक जण जखमी झाला. त्याला कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. पहाटे 2.45च्या सुमारास 10-15 जण रुग्णालयात आले आणि त्यांनी हाणामारी सुरू केली. दोन्ही गटांतील तळीरामांनी अपघात विभागाबाहेरील स्ट्रेचर आणि व्हीलचेअर फेकून मारल्या. ही हाणामारी 10-15 मिनिटे सुरू होती. ती सोडवण्यासाठी रुग्णालयातील खासगी सुरक्षारक्षक गेला आणि स्ट्रेचरचा पत्रा लागून जखमी झाला. 

पोलिसांनीही हाणामारी सोडवण्याचा प्रयत्न केला; परंतु मद्यपी त्यांनाही दाद देत नव्हते. रक्तबंबाळ अवस्थेत ते अपघात विभागात फिरत होते. दोन जणांच्या पाठीला जखम झाल्याने डॉक्‍टर त्यांना उपचार करण्याची विनंती करीत होते; परंतु ते ऐकण्याच्या पलीकडे होते. अखेर पोलिसांनी हिसका दाखवल्यावर ते वठणीवर आले आणि त्यांनी मुकाटपणे मलमपट्टी करून घेतली. हा गोंधळ सुरू असताना जुहू सर्कल परिसरात पहाटे 3.45 च्या सुमारास झालेल्या हाणामारीत जबर जखमी झालेल्या एकाला मोटारसायकलवरून रुग्णालयात आणले. अपघात विभागातील स्ट्रेचर आणि व्हीलचेअरची तळीरामांनी मोडतोड केल्यामुळे मोटारसायकल थेट अपघात विभागातील डॉक्‍टरच्या तपासणी कक्षाबाहेरच आणण्यात आली. 

Web Title: Drunkard of a hospital Rada