सुकी मासळीही महागाईच्या जाळ्यात

file photo
file photo

मुंबई : तीन महिने समुद्रावर घोंघावत असलेली वादळे आणि किनारपट्टीवर पडत असलेल्या अवकाळी पावसाने मच्छीमारांना बोटी किनाऱ्यावरच लावाव्या लागल्याने मासळीचे दर चांगलेच वाढले होते. मासे परवडेनासे झाले की मत्स्यप्रेमी सुक्‍या मच्छीकडे वळतात, परंतु पावसाने तीही महाग करून ठेवली आहे. कोळीवाड्यांमध्ये सुक्‍या मासळीचा दुष्काळ पडला आहे. किरकोळ बाजारात सुक्‍या मासळीचे दर जवळपास दुप्पट झाले आहेत.

पापलेट-सुरमईसारख्या ताज्या माशांप्रमाणेच सुके बोंबील, बांगडा, मांदेली, वाकट्या, करंदी (सोडे) आदी सुके मासेही मत्स्याहारी खवय्यांचे आवडते असतात. पावसाळ्यात नेहमीची मासेमारी बंद असल्याने सुकी मासळी आवडीने खाल्ली जाते. वर्षभर वाळवून पावसाळ्यासाठी बेगमी करून ठेवलेला सुक्‍या मासळीचा स्टॉक बाहेर काढला जातो. दोन-तीन महिन्यांत तो संपला की तोपर्यंत मासेमारी सुरू होते व ताजा मिळालेला माल सुकवून तो बाजारात आणला जातो. मात्र, यंदा मासेमारी सुरू झाल्यानंतरच्या गेल्या तीन महिन्यांत हवामानाचे सारे चक्रच बिघडल्याने सुक्‍या मासळीवर संक्रांत आली आहे. 

१५ ऑगस्टपासून मासेमारीचा हंगाम सुरू झाला, तरी त्यानंतर समुद्रात आलेल्या दोन-तीन चक्रीवादळांमुळे मच्छीमारांना बोटी घेऊन जाता आलेच नाही. जे गेले त्यांना फारशी मासळी न मिळता परत यावे लागल्याने फेरीचा सारा खर्चही अंगावर पडला. त्यातच जी मासळी मिळाली ती कोळीवाड्यांमध्ये सुकवण्यासाठी ठेवण्यात आली. मात्र, सतत पडणाऱ्या पावसामुळे सारा वाळवलेला साठा कुजल्याने तो फेकूनच द्यावा लागला. 

लहरी निसर्गामुळे सध्या बाजारात मालच येत नाही. मे महिन्यापूर्वी मी दरमहा दुकानात साठ ते सत्तर किलो सुक्‍या मासळीचा साठा करून ठेवत होतो व तो खपतही होता, असे शिवडीच्या सुक्‍या मासळी बाजारातील विक्रेते लाला खान यांनी सांगितले.

प्रमाण कमी झाले
मुंबईतील वेसावे, मढ आणि मार्वेपासून उत्तन, वसई ते डहाणू किनारपट्टीवरील कोळीवाड्यांमध्ये मासे सुकवले जातात. डोल पद्धतीने समुद्रात पकडलेले मासे वनारी (मंडप) लावून सुकवले जातात. मात्र पाच वर्षे एलईडी लाईट व पर्ससीन जाळ्यांच्या मासेमारीमुळे सुकवण्याचे मासे मिळण्याचे प्रमाणच कमी झाल्याची माहिती अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी दिली. 


शिवडी बाजारातील किलोमागे दर

  • मांदेली : ९० ते १०० रु. (गेल्या वर्षी : ६० ते ७० रु)
  • बोंबील : २०० ते २५० रु. (गेल्या वर्षी : १५० रु)

किरकोळ बाजारातील दर

  • सुके बोंबील (छोटे) : १२० रुपये शेकडा
  • सुके बोंबील (मोठे) : २२० रुपये शेकडा
  • सोडे : १००० रुपये किलो

रायगडहून येणारे मासे

  • बोंबील : ४०० रु. किलो
  • सुकट : ११० रु. किलो
     

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com