मुंबई - सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) पुण्यातील प्रसिद्ध डीएसके ग्रुपच्या 904 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. त्यात जमीन, इमारत, फ्लॅट, एलआयसी पॉलिसी, रोख ठेवी आदींचा समावेश आहे.
याप्रकरणी 35 हजारांहून अधिक गुंतवणूकदारांची एक हजार 129 कोटी रुपये गुंतवल्याचे आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे. याप्रकरणी डीएसके समूहाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कुलकर्णी, त्यांच्या पत्नीसह तीन मुख्य आरोपी आहेत. ईडीच्या तपासानुसार आरोपींनी भागीदारीमध्ये आठ कंपन्या स्थापन केल्या. कटाचा भाग म्हणून मुंबई, पुणे, कोल्हापूरसह राज्यभरातील गुंतवणूकदारांकडून पैसे घेण्यात आले.
त्यांना या आठ कंपन्या "डीएसकेडीएल' या कंपनीचा भाग असल्याचे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात या कंपन्यांचा मुख्य कंपनीशी काही संबंध नव्हता. तरीही 2006 पासून 2017 पर्यंत गुंतवणूक स्वीकारण्यात आली. गुंतवणूकदारांचे पैसे अनेक खात्यांमध्ये वळवण्यात आल्याचेही ईडीच्या तपासात समोर आले आहे.
|