खरेदी करायचीय; मग चला दुबईला!

खरेदी करायचीय; मग चला दुबईला!

दुबई : दुबई शॉपिंग फेस्टिव्हलचे यंदा पंचविसावे वर्ष असून, त्यानिमित्ताने दुबईत पर्यटकांच्या अलोट गर्दीसोबतच खरेदीचा उत्साहही ओसंडून वाहतो आहे. विविध प्रकारचे खुले बाजार आणि मॉलमध्ये अनेक सवलती देण्यात आल्या आहेत. पर्यटकांच्या स्वागतासाठी संपूर्ण शहर सजले आहे. सोन्याच्या दागिन्यांच्या लाखो डिझाईन पाहून खरेदीदार येथे हरखून जात आहेत. 

दुबई शॉपिंग फेस्टिव्हल 26 डिसेंबर 2019 पासून सुरू झाला असून, तो 1 फेब्रुवारी 2020 पर्यंत चालणार आहे. जगभरातील सुमारे 1000 ब्रॅंड आणि चार हजारावर दुकाने यात सहभागी आहेत. 1996 पासून सुरू असलेल्या या फेस्टिव्हलने अनेक पर्यटकांना आकर्षित केले आहे. विविध देशांतून वेगवेगळ्या वयोगटाचे आणि संस्कृतीचे लोक येथे येत असल्याने त्यांचा खरेदी उत्साह द्विगुणित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. त्यामुळेच विविध सवलतींचा वर्षाव केला जातो आहे, असे दुबई फेस्टिव्हलचे सीईओ अहमद अल खाजा यांनी सांगितले. दरवर्षी येणाऱ्या पर्यटकांसाठी तो अधिक आनंददायी व्हावा, असे आमचे प्रयत्न आहेत, असेही ते म्हणाले. 

दुबईतील जगातील सर्वात उंच बुर्ज खलिफा आणि अन्य लोकप्रिय पर्यटनस्थळांबरोबरच खरेदीच्या विविध उपक्रमांनी पर्यटकांच्या आनंदात भर घातली आहे. दुबई मॉल, अल फतेम मॉल, सिटी सेंटर, एमिरेट्‌स मॉल, सिटी सेंटर बार्शा अशा अनेक मॉल्समध्ये बारा तासांचे प्रमोशनल सेल, आकर्षक बक्षीस योजनांची लयलूट आहे. गिफ्ट व्हाऊचरसोबत आलिशान कार देणाऱ्या लॉटरीही आकर्षण ठरत आहेत.

यासोबत मार्केट आउटसाईड द बॉक्‍स उपक्रमात सांस्कृतिक मेजवानी देण्यात आली आहे. यात विविध प्रकारची फॅशन, संगीत, देश-विदेशी बॅंड्‌स, खाद्यप्रकारांचा आनंद लुटता येतो. मुलांसाठी अनेक प्रकारचे गेम झोन्सही येथे आहेत. ग्लोबल व्हिलेजमध्ये अनेक देशांच्या सांस्कृतिक ओळखीबरोबरच त्यांची खासियत असलेल्या पारंपरिक लोकप्रिय वस्तू उपलब्ध आहेत. यात भारताचाही समावेश आहे. 

सुक हेरिटेज 
मॉल संस्कृतीबरोबरच पारंपरिक खुल्या बाजारांत खरेदीचा आनंदही येथे मिळतो. अल सीफमध्ये नव्या संस्कृतीच्या बाजारांना पारंपरिक लूक देण्यात आला आहे. अरबी संस्कृतीची ओळख यानिमित्ताने करून देण्यात आली आहे. त्यासोबतच गोल्ड, स्पाईस सुकची सफर करता येते. सोन्याच्या विविध दागिन्यांनी डोळे दिपून जातात. जगातील सर्वात मोठी अंगठीही येथे पाहायला मिळते. शिवाय येथे मसाल्याचे अनेक प्रकार मसाला मार्केटमध्ये आहेत. तिथेही पर्यटकांची गर्दी होत आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com