मुंबई - महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) लॉटरीत दोन घरे लागलेल्या शिवसैनिक विनोद शिर्के यांनी यातील पाच कोटी 80 लाखांची सदनिका वास्तुदोषाचे कारण पुढे करीत म्हाडाला परत केली आहे. शिर्के यांना वरळी येथील म्हाडाच्या लॉटरीत एकाच इमारतीत दोन घरे मिळाली होती.
डिसेंबर 2018 मध्ये म्हाडाने उच्च उत्पन्न गटासाठी लॉटरी काढली होती. यात नाना चौकातील धवलगिरी या इमारतीत विनोद शिर्के दोन सदनिकांचे लाभार्थी ठरले होते. एकाच इमारतीतील पाचव्या मजल्यावरील सदनिकेची किंमत 5.80 कोटी होती, तर तिसऱ्या मजल्यावरील सदनिका 4.99 कोटींची होती. म्हाडाने लॉटरी पद्धतीने आतापर्यंत विक्री केलेल्या सदनिकांपैकी सर्वांत महागड्या सदनिका या होत्या. सुरुवातीला म्हाडाची सर्वांत महागडी सदनिका घेण्याची शिर्के यांची इच्छा होती. सदनिका पाहायला गेल्यानंतर सदर सदनिकेत वास्तुदोष असल्याची माहिती त्यांचे मित्र वास्तूतज्ज्ञ तेजस तळसकर यांनी दिली. शयनगृहाची (बेडरूम) रचना उत्तर पूर्व अशी असल्याने कौटुंबिक कलह निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशी वास्तू राहण्यास योग्य नाही, असे तळसकर यांनी सांगितल्याने शिर्के यांनी ही सदनिका म्हाडाला परत केली आहे.
म्हाडाच्या नियमानुसार लॉटरीत दोन सदनिका मिळाल्या असतील, तर एक परत करावी लागते. त्यानुसार, तिसऱ्या मजल्यावरील सुमारे 5 कोटींची सदनिका स्वीकारणार असून, महागडी पाचव्या मजल्याची सदनिका परत केल्याचे त्यांनी सांगितले.
प्रतीक्षा यादीतील व्यक्तीला संधी
पाचव्या मजल्यावरील वास्तू राहण्यायोग्य करण्यासाठी त्यात अंतर्गत बदल करावे लागणार होते. मात्र, म्हाडा नियमानुसार इमारतीच्या अंतर्गत रचनेत बदल करता येत नसल्याने तिसऱ्या मजल्यावरील सदनिका स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची कागदपत्र पूर्ततेची प्रक्रिया सुरू केल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, नियमानुसार या सदनिकेसाठी प्रतीक्षा यादीत असलेल्या व्यक्तीला या सदनिकेची ऑफर केली जाईल, असे म्हाडा प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.