Mumbai Rains : खराब वातावरणामुळे गडकरींचे विमान दीड तास उशिरा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

रस्ते व वाहतूक केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचे विमान खराब वातावरणामुळे मुंबई विमानतळावर वेळेवर उतरू शकले नाही.

मुंबई : रस्ते व वाहतूक केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचे विमान खराब वातावरणामुळे मुंबई विमानतळावर वेळेवर उतरू शकले नाही. तब्बल दीड तास आकाशात गिरक्या घेतल्यानंतर विमानाला धावपट्टीवर उतरवण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून शहरातील मुसळधार पावसामुळे अनेक विमानांना धावपट्टीवर उतरवण्यासाठी समस्या निर्माण होत होत्या. त्याचा फटका आज केंद्रिय मंत्री गडकरी यांनाही बसला आहे. 

भाजपा सरकारने शंभर दिवस फास्ट ट्रॅकवर काम करून, देशासह महाराष्ट्रासाठी घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयाची माहिती पत्रकारांना देण्यासाठी आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी नागपूर विमानतळावरून विमानात बसून  गडकरी मुंबईसाठी रवाना झाले. दुपारी 1 वाजता त्यांची पत्रकार परिषद होती. मात्र, खराब वातावरणामुळे तब्बल दिड तास विमान आभाळातच फिरत असल्याने गडकरी यांना कार्यक्रमाच्या स्थळी पोहचण्यासाठी उशीर झाला. दरम्यान त्यांनी पत्रकार परिषदेत या घटनेचा उल्लेख करत पत्रकारांसमोर दिलगिरी व्यक्त केली.

सततच्या खराब वातावरणामुळे गोवा, बंगरूळू, नागपूर, दिल्ली येथील विमानांना मुंबई विमानतळावर उतरण्यासाठी सिग्नल मिळण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे अनेक विमानांना इतर विमानतळावर उतरून सिग्नल मिळवण्यासाठी वाट पाहावी लागत आहे. या सर्वाचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागतोय.

गेल्या काही दिवासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे वातावरण खराब आहे. धुक्याचं प्रमाण जास्त असल्याने विमानांना धावपट्टीवर उतरवण्यासाठी तांत्रिक अडचणी येत असल्याची माहिती छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे प्रवक्ते यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: due to bad weather condition nitin gadkari s airplane landed late