गणेश नाईकांच्या आशीर्वादामुळेच भाजपमध्ये : संदीप नाईक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

आमच्या कुटुंबांत मला आणि सागरला निर्णय घेण्याच्या गणेश नाईकांनी दिलेल्या स्वातंत्र्यामुळेच मला एवढा मोठा निर्णय सहजपणे घेता आला, असे उद्‌गार संदीप नाईक यांनी ‘सकाळ’शी बोलताना काढले. 

मुंबई : नवी मुंबईचे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या आशीर्वाद आणि खंबीर पाठिंब्यामुळेच माझा भाजपमध्ये जाण्याचा निर्णय सोपा झाला. आमच्या कुटुंबांत मला आणि सागरला निर्णय घेण्याच्या गणेश नाईकांनी दिलेल्या स्वातंत्र्यामुळेच मला एवढा मोठा निर्णय सहजपणे घेता आला, असे उद्‌गार संदीप नाईक यांनी ‘सकाळ’शी बोलताना काढले. 

संदीप नाईक यांनी त्यांचा चुलतभाऊ सागर नाईक आणि नवी मुंबईतील राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. देशात बदलत असलेल्या परिस्थितीनुसार आपली भूमिका न बदलल्याने शहराचे नुकसान होऊ नये, म्हणून आपण भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्पष्टीकरण नाईक यांनी दिले. 

मुंबईतील गरवारे सभागृहात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर पहिल्यांदाच संदीप नाईक यांनी ‘सकाळ’शी बोलताना गेल्या दोन दिवसांपासून बाळगलेले मौन सोडले. दोन वेळा आमदार म्हणून निवडून आल्याने राज्यात आणि देशात माझी विशिष्ट ओळख आहे. त्यामुळे मला स्वतःला खूप काही मोठे होण्यासाठी मी हा निर्णय घेतला असे नाही. मला आजपर्यंत नवी मुंबईतील नागरीकांकडून जे प्रेम मिळाले, त्या प्रेमावर खरे उतरायचे आहे. शहरातील उरलेली कामे पूर्णत्वास न्यायची आहेत. चांगले प्रकल्प शहरात आणायचे आहेत. शहराचा जो नावलौकिक आजपर्यंत आहे, शहराचे जे वेगळेपण राज्यात आणि देशात आहे ते वाढवायचे आहे, असे प्रतिपादन संदीप नाईक यांनी यावेळी केले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली देशाची वाटचाल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा त्याला सकारात्मक प्रतिसाद असतो; त्यामुळे कितीही कठीण प्रश्न असला तरी तो साधा व सोपा करून समाजातील प्रत्येक घटकांना दिलासा देण्याची त्यांची कार्यपद्धती ही नवी मुंबईच्या विकासासाठी मला पूरक वाटल्याने आता भाजपमध्ये काम करणे सोपे जाईल, असा विश्‍वास नाईक यांनी व्यक्त केला. तसेच भाजपमध्ये राहून नवी मुंबईतील सर्वसमावेशक गावे, झोपडपट्टी व शहराचा विकास करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची आपली तयारी असल्याचे संदीप नाईक यांनी सांगितले. 

देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यात आपले शहर कुठेही मागे पडू नये. तसेच आपली राजकीय भूमिका न बदलता आपल्या शहराला वेठीस धरले जाऊ नये. शहराचे नुकसान होऊ नये. म्हणून आपण भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.
- संदीप नाईक, आमदार.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to the blessings of Ganesh Naiks I was in BJP: Sandeep Naik