फुंडकर यांच्या निधनामुळे संवेदनशील व अनुभवी लोकप्रतिनिधी काळाच्या पडद्याआड : विखे पाटील

संजय शिंदे 
गुरुवार, 31 मे 2018

मुंबई, ता : राज्याचे कृषीमंत्री भाऊसाहेब उपाख्य पांडुरंग फुंडकर यांच्या आकस्मिक निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. त्यांच्या निधनामुळे एक संयमी, संवेदनशील व अनुभवी लोकप्रतिनिधी काळाच्या पडद्याआड गेल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.

फुंडकर यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करताना विखे पाटील म्हणाले की, त्यांनी राज्याच्या राजकारणात स्वतःची एक वेगळी प्रतिमा निर्माण केली होती. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून समोर येत त्यांनी राजकारणात मोठे काम केले. आमदार, खासदार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते, राज्याचे मंत्री अशी अनेक पदे त्यांनी भूषवली. राजकारणात मिळालेल्या प्रत्येक संधीला त्यांनी प्रामाणिकपणे न्याय देण्याचा प्रयत्न केला. ते राज्यातील एक मोठे नेते होते. मात्र त्यांचा वावर नेहमी एखाद्या कार्यकर्त्यासारखा असायचा. प्रत्येकाशी त्यांचे संभाषण व संबंध मित्रत्वाचे असायचे.

वैयक्तिक पातळीवर आमचे नाते मैत्रीपूर्ण होते. विशेषत: कृषि क्षेत्रातील प्रश्नांवर आम्ही अनेकदा चर्चा करायचो. राहुरी कृषी विद्यापिठाने एक अभ्यासक्रम बंद केल्यासंदर्भात गेल्याच आठवड्यात आमची चर्चा झाली होती. ते आमचे अखेरचे संभाषण असेल, अशी शंकाही त्यावेळी मनाला शिवली नव्हती. परंतु, काळाने अचानक घाला घालून सर्वांचे मित्र असलेले व्यक्तीमत्व हिरावून घेतल्याचे सांगून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाऊसाहेब फुंडकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. 

Web Title: due to death of phundkar, the sensitive and experienced people's representative of the era has lost : vikhe patil