चौपदरीकरणामुळे बावीस गावाच्या पाणीयोजना बाधित 

सुनील पाटकर
शुक्रवार, 22 जून 2018

चौपदरीकरणाचे काम सुरु होऊनही या योजनांची पर्यायी कामे मार्गी न लागल्याने महाड ग्रामस्थ चिंतेत आहेत.

महाड - मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे महाड व पोलादपूरमधील बावीस गावाच्या नळपाणीपुरवठा योजना बाधित होत असुन चौपदरीकरणाचे काम सुरु होऊनही या योजनांची पर्यायी कामे मार्गी न लागल्याने ग्रामस्थ चिंतेत आहेत. पावसाळ्यानंतर बाधीत योजना पूर्ववत करणारी कामे सुरु न झाल्यास या गावात पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे.

इंदापूर ते कशेडी दरम्यान मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. माती भरावाची, मोऱ्यांची कामे बहुतांशी होत आली आहे.हा प्रकल्प होत असतानाच चौपदरीकरणात पाणीयोजना, विहिरी तसेच विंधन विहिरी बाधीत होत आहेत.त्यामुळे या योजनांची नव्याने देखभाल दुरुस्ती करावी लागणार आहे. जॅकवेल, गुरुत्ववाहिनी अशी कामे करावी लागणार आहेत. महाड व पोलादपूर तालुक्यातील बावीस गावाच्या नळपाणीपुरवठा योजना यामुळे अडचणीत आल्या आहेत. अशा योजनांचे दुरुस्ती अंदाजपत्रक महाराष्ट्र जीवन प्राधीकरण व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने तयार करु तशी मान्यताही घेतलेली आहे. परंतु प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही.पाणीपुरवठा विभागांचे हे प्रस्ताव दिल्ली येथे मंजुरीसाठी महामार्ग विभागाने सहा महिन्यापूर्वी पाठवूनही त्यांना मंजुरी मिळालेली नाही. चौपदरीकरणाचे काम सुरु झाल्यानंतर ही कामे करणे अवघड होणार आहे. महाड व पोलादपूर तालुके मुळातच टंचाईग्रस्त आहेत त्यात या गावांची भर पडण्यापूर्वी कामे केली जावीत, अशी नागरिकांची मागणी आहे.

महाड शहर, करंजखोल, वीर, दासगाव, वहूर, केंबुर्ली, साहिलनगर, गांधारपाले, चांढवे खुर्द, चांढवे बुद्रुक, कांबळे, नडगाव, कोथेरी तर पोलादपूर तालुक्यातील पोलादपूर शहर, भोगाव खुर्द, पार्ले, चोळई, धामणदेवी, लोहारमाळ, काटेतळी, सडवली, लोहारे पवारवाडी, वीर आदीवासी वाडी हातपंप, दासगाव मधील एक विहिर व एक विंधनविहिर, गांधारपाले येथील सहा विंधनविहिरी व एक विहीर.

सर्व योजनांसाठी सुमारे 12 कोटी खर्च -
ज्या योजना बाधीत होत अहेत त्यांची पूर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहेत. डिसेंबर 2017 मध्येच महामार्ग विभागाला अशा योजनांची माहिती व सदर कामे पूर्ण करण्याबाबत कळवण्यात आलेले आहे - ए. ए. तोरो. (ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, महाड)

चौपदरीकरणात बाधीत होणाऱ्या नळपाणीपुरवठा योजनांचा प्रस्ताव वरिष्ठ पातळावरुन दिल्ली येथे मंजूरीसाठी पाठवलेला आहे.मंजूरी येताच काम सुरु केले जाईल. - अमोल महाडकर - अभियंता (रा. महामार्ग विभाग, महाड)
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Due to the four laning the water scheme of Twenty two villages was interrupted