फ्री वायफायमुळे स्थानकांत गर्दी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 जून 2018

मुंबई - एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या रेल्वे प्रशासनाने रेल्वे परिसरातील फेरीवाल्यांना हद्दपार करून रेल्वे परिसर मोकळा ठेवण्यावर भर दिला आहे; मात्र रेल्वेस्थानकांमध्ये देण्यात येणाऱ्या मोफत वायफाय सुविधेमुळे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे.

मुंबई - एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या रेल्वे प्रशासनाने रेल्वे परिसरातील फेरीवाल्यांना हद्दपार करून रेल्वे परिसर मोकळा ठेवण्यावर भर दिला आहे; मात्र रेल्वेस्थानकांमध्ये देण्यात येणाऱ्या मोफत वायफाय सुविधेमुळे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे.

वाढती प्रवासी संख्या पाहता रेल्वेने पश्‍चिम व मध्य रेल्वेस्थानकांतील काही महत्त्वाच्या स्थानकांचे नूतनीकरण केले आहे. या स्थानकांमध्ये तिकीट आरक्षण केंद्र उन्नत बांधण्यात आल्यामुळे मोकळी जागा उपलब्ध झाली आहे. तेथे रेलटेलच्या माध्यमातून प्रवाशांना मोफत वायफाय सुविधा पुरवण्यात आली आहे. त्यामुळे स्थानकांवर प्रवासी तासन्‌तास रेंगाळत असल्याचे निदर्शनास आले आहे.

पश्‍चिम रेल्वेवर मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे, अंधेरी, बोरिवली, भाईंदर; तर मध्य रेल्वेच्या सीएसएमटी, भायखळा, दादर, कुर्ला, मुलुंड या स्थानकांमध्ये मोफत वायफाय वापरणाऱ्यांची गर्दी पाहायला मिळते.

चर्चगेट स्थानकातील फलाट क्रमांक चार व तिकीट आरक्षण केंद्रासमोरील जागेत वायफाय वापरणारे असतात. मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे स्थानकात फलाटांवर, पुलांवरही गर्दी असते. अंधेरी स्थानक पश्‍चिमेकडील तिकीट आरक्षण केंद्र आणि डेकच्या मध्यभागी वायफाय वापरणारे दिसतात. 

गोरेगाव, राममंदिर व बोरिवली स्थानकांतही अशीच परिस्थिती आहे. या सर्व स्थानकांत लांबपल्ल्याच्या गाड्यांचे प्रवासी व लोकल प्रवाशांची गर्दी असते. त्यात या वायफाय वापरणाऱ्यांची भर पडते. त्यामुळे दुर्घटना होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.  अशा प्रवाशांमुळे वेगळीच समस्या उद्‌भवत आहे.

गर्दीकडे दुर्लक्ष
एकीकडे एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने रेल्वे परिसर मोकळा ठेवण्यावर भर दिला; मात्र या रिकामटेकड्या गर्दीकडे दुर्लक्ष केले आहे. गर्दीचे नियोजन करण्यासाठी मध्य व पश्‍चिम रेल्वेने महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांचीदेखील नेमणूक केली आहे. तरी याकडे रेल्वे सुरक्षा बलदेखील लक्ष देत नसल्याचे समोर आले आहे. आम्ही संबंधित स्थानकांची पाहणी करू; मात्र जर तेथे तिकीटधारक असतील तर त्यावर कारवाई करणे शक्‍य नसल्याचे पश्‍चिम रेल्वेच्या सुरक्षा बलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग पोलिसांनी वायफाय वापरकर्त्यांवर लक्ष ठेवले पाहिजे.
- नंदकिशोर देशमुख,  अध्यक्ष, ठाणे रेल्वे प्रवासी संघटना

Web Title: Due to free WiFi crowds of locals