गणेशोत्सवासाठी चाकरमानी निघाले... कोकण रेल्वे फुल्ल

गणेशोत्सवासाठी चाकरमानी निघाले... कोकण रेल्वे फुल्ल

ठाणे- गणेशोत्सवाला अवघे काही तास उरले असतानाच गेले काही दिवस कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी लगबग सुरु झाली आहे. मुंबई, दादर, वसई, ठाणे आणि पनवेल आदी स्थानकातून कोकणात जाणाऱ्या लांबपल्याच्या गाड्या भरभरून जात आहेत.गणेशोत्सव विशेष गाड्याही या मार्गावर धावत असल्या तरी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई), दादर, ठाणे स्थानकासह पनवेल स्थानकातही तुडुंब गर्दीत चाकरमानी रांगा लावून गणेशोत्सवासाठी कोकणात प्रस्थान करीत आहेत.

कोकणातील चाकरमान्यासाठी कोकण रेल्वे सुरु झाली मात्र, याचा फायदा कोकणातील प्रवाश्यापेक्षा दक्षिणेकडील प्रवाश्यांना अधिक होत आहे. कोकणातील चाकरमानी कोकणकन्या, मांडवी, जनशताब्दी एक्स्प्रेस आणि सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस या गाड्यांनी प्रवास करतो. पण, बहुतांश वेळा या गाड्या उशीराने धावत असतात. दक्षिणेकडील लांबपल्याच्या गाड्यांना पुढे जाण्यासाठी कोकणच्या गाड्यांना प्रत्येक स्थानकावर थांबवुन ठेवले जाते. त्यामुळे, नियमित गाड्याही विलंबाने धावत असल्याने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची रखडपट्टी होत असल्याचा आरोप प्रवाशी करीत आहेत. ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवरून सुटणाऱ्या कोकण रेल्वेच्या गाडीसाठी कोकण रेल्वे प्रवाशी संघाद्वारे रांगेची शिस्त नियमितपणे लावण्यात येते.

नियमित गाडी अथवा डबे तरी वाढवा
कोकणकन्या, मांडवी व सावंतवाडी या गाड्यांना ठाणे आणि पनवेल येथे राखीव डबे असतात. या डब्यांमध्ये जागा मिळवण्यासाठी प्रवासी दोन-तीन दिवस आधी रांगा लावतात.तरीही, अक्षरशः चेंगराचेंगरी करीत आपल्या कच्याबच्चांसह चाकरमानी गाव गाठतात. तेव्हा, वाढत्या गर्दीमुळे एखादी दुर्घटना घडण्याआधीच रात्रीच्या प्रवासासाठी अतिरिक्त नियमित गाडी सुरू करण्यासह एखादा डबा वाढवण्याची मागणी प्रवाशीवर्गातून होत आहे.

रेल्वेच्या नियमाप्रमाणे प्रवास दिवसाच्या चार महिने म्हणजे 120 दिवस आधी तिकीट बुकिंग करावी लागते.13 सप्टेंबरला गणेश चतुर्थी कोकणात जाणाऱ्या गाड्या फुल्ल झाल्या. त्यामुळे अनेकजण प्रतीक्षा यादीवर तर,अनेकांना प्रतिक्षा यादीतही स्थान मिळाले नाही. त्यामुळे, अशा वंचिताची मदार एक तर रांगा लावून जनरल बोगीतून जाणे किंवा गणपतीसाठी सोडल्या जाणाऱ्या विशेष गाड्यांमधून प्रस्थान करणे. बहुतेकजण यातील रांगेचा पर्याय निवडत असल्याने गेले काही दिवस ठाणे स्थानकात कुटुंब कबिल्यासह चाकरमान्यांची रीघ लागलेली आहे. तरीही, कोकण रेल्वे प्रवाशी संघाकडून चाकरमान्यांना रांगेत सोडून मदतकार्य केले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com