महागाईमुळे गृहिणींचा वरखर्चाला लगाम

file photo
file photo

मुंबई : वाढत्या महागाईने सर्वसामान्य माणसाचे कंबरडे आधीच मोडून पडले असताना अवकाळी पावसाने त्यात भरच घातली आहे. लांबलेल्या पावसाने भातपिकाचे अतोनात नुकसान केल्याने रोजच्या गरजेच्या कोंथिबीर, कांदा, लसूण आणि भाजीपाल्यासारख्या वस्तूंचे दर खिसा चांगलाच खाली करीत आहेत. अरबी समुद्रातील वादळामुळे मासेमारीवरही प्रतिकूल परिणाम झाला असून मासेही महागले आहेत. महिनाभरापासून मुंबईत महिनाभराच्या खर्चात चार ते पाच हजारांची वाढ झाली असून त्यावर उपाय म्हणून गृहिणींनी वरखर्चाला लगाम लावला आहे.

स्वयंपाकघरातील खर्च वाढल्याने अनेक कुटुंबीयांनी रेशनिंग सुरू केले आहे. हौसमौज बाजूला ठेवून काटकसर सुरू केली आहे. वाहन, गृह आणि वैयक्तिक कर्जाचे हप्ते भरण्यासाठी अनेकांवर तर बचतीला हात लावण्याची वेळ आली आहे. 

मुंबईतील चौकोनी वा सहा जणांच्या कुटुंबाला वाण सामान, भाजीपाला, सिलिंडर, मासे-मटण आदींसह इतर किरकोळ खर्चासाठी पूर्वी १२ ते १४ हजार रुपये महिन्याला लागत होते. त्यात फळेही येत होती. मात्र, आता स्वयंपाकघराचा खर्चच १६ ते १७ हजारांच्या वर गेला आहे. त्यावर गृहिणींनी हातचे राखून स्वयंपाक करण्यास सुरुवात केली आहे. माशांची भूक चिकन आणि अंड्यांवर भागवली जात आहे. अनेक घरातील हॉटेलिंगही कमी झाले आहे.
 
ऑगस्ट महिन्यात कोणत्याही अर्धा किलो भाजीसाठी ३० ते ४० रुपये मोजावे लागत होते. त्या किमतीत आत पाव किलोच भाजी मिळू लागली आहे. सकाळच्या नाश्‍त्याला मराठमोळ्या घरांमध्ये पोहे, उपमा किंवा शिरा असा बेत आठवड्यातून तीन ते चार दिवस असायचाच. पण, आता पंधरवड्यातून एकदाच पोहे-उपम्याचा घाट घातला जात आहे. त्याऐवजी इडली व घावण असा नाश्‍ता सध्या केला जात आहे. तो पर्याय पोहे-उपम्यापेक्षा वेळ आणि खिसा वाचवणारा ठरत असल्याचे काही गृहिणींनी सांगितले.

त्रिवेणी मोरे पाव किलाेच भाजी घेतात
बाजारातून अर्धा किलो भाजी आणत होतो. सध्या त्याच किमतीत पावच किलो भाजी मिळत आहे. सध्या महागाईमुळे पावच किलो भाजी आणतो. कांदे-बटाटेही दोनऐवजी एकच किलो भरतो. जेवणामध्ये एक वेळेला कडधान्याची उसळ बनवली जाते. माशाऐवजी अंडी व चिकन बनवले जाते. पूर्वी कोशिंबीर सलाड रोज असायचे, पण आता आठवड्यातून एक-दोन वेळाच करतो. त्यातही कांदा व गाजर हातचे राखून वापरतो, असे दादरच्या त्रिवेणी मोरे यांनी सांगितले.

  • कुटुंबातील सदस्य : चार 
  • स्वयंपाकघरातील खर्च 
  • ऑगस्टमध्ये : 10 ते 12 हजार 
  • ऑक्‍टोबरपासून : 14 ते 16 हजार 

आठवड्यातला एक दिवस फक्त भात
घरी रोज दोन्ही वेळेला दोन भाज्या बनवल्या जात. आता सकाळी डब्याला जी भाजी बनवतो तीच दुपारी जेवणालाही असते. तीन ते चारऐवजी दिवसाला दोन भाज्या बनवल्या जातात. आठवड्यात एक दिवस एकदा संपूर्ण स्वयंपाक करण्याऐवजी एकच भाताचा प्रकार, दही किंवा कोशिंबीर बनवली जाते. आठवड्यातून एकदाच मासे खातो. महिन्यामध्ये हॉटेलमध्ये दोनदा जेवायला जायचो, पण आता एकदाच जातो. ते पण काही विशेष असेल तरच, असे शीवच्या रहिवासी दीपिका शेरखाने म्हणाल्या.

  • कुटुंबातील सदस्य : चार 
  • स्वयंपाकघरातील खर्च 
  • ऑगस्टमध्ये : 20 हजार 
  • ऑक्‍टोबरपासून : 25 हजार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com