अपुऱ्या देखभालीचा फटका

railway-track
railway-track

ठाणे - मध्य रेल्वेवरील कल्याणपल्याडच्या दोन स्थानकांतील अंतर सात ते आठ किलो मीटरच्या आसपास आहे. त्यामुळे या भागातील रेल्वे रुळांच्या; तसेच साधनसामग्रींच्या देखभाल दुरुस्तीत कुचराई होत असल्याचा आरोप रेल्वे प्रवासी संघटनांनी केला आहे. जास्त अंतर आणि अपुरे मनुष्यबळ यामुळे या भागाची नीट काळजी घेतली जात नसल्याचा फटका रेल्वे रुळांना बसत आहे. त्यामुळे या भागामध्ये वारंवार रेल्वे रूळ तुटण्याचे; तसेच तांत्रिक बिघाडाच्या घटना घडत आहेत.
विठ्ठलवाडीजवळ गुरुवारी सकाळी झालेल्या अपघाताच्या कारणांचा शोध रेल्वेच्या सुरक्षा विभागाकडून घेतला जाईल; मात्र असे त्रास कमी होण्यासाठी कल्याणपल्याडच्या स्थानकातील तांत्रिक दुरुस्तीची कामे विशेष महत्त्व देऊन करण्याची विनंती प्रवासी संघटनांकडून करण्यात आली आहे. या भागामध्ये अनेक वेळा रात्रीच्या वेळी रेल्वे रुळाचे साहित्य चोरीला जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळेही अपघात घडण्याची शक्‍यता जास्त आहे. या भागातील रेल्वे रुळांची सुरक्षा तितकीच गरजेची असल्याचे कल्याण-कसारा-कर्जत प्रवासी संघटनेच्या सदस्यांचे म्हणणे आहे.

विठ्ठलवाडीजवळच्या अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे कोलमडली. कल्याणपल्याडच्या स्थानकांमध्ये असे प्रकार वारंवार होत असून त्यामागे या भागातील अपुरी देखभाल- दुरुस्ती असल्याचे प्रवासी संघटनांचे म्हणणे आहे. मध्य रेल्वेच्या मार्गावरील मुंबईपासून कल्याणपर्यंतच्या स्थानकांमधील अंतर सरासरी एक ते दिड किलो मीटरच्या आसपास आहे. कल्याणपुढील स्थानकांमध्ये या अंतरात वाढ होते. कर्जत आणि कसाऱ्यापर्यंतच्या स्थानकांमध्ये हे अंतर सात ते आठ किलो मीटरच्या आसपास आहे. कर्जतपलीकडच्या स्थानकांमध्ये दोन स्थानकातील अंतर 12 ते 14 किलो मीटरपर्यंत आहे. मुंबईपासून जसजसे अंतर दूर जाऊ तितकी कर्मचाऱ्यांची संख्याही घटत असल्यामुळे जास्त अंतराचे काम कमी कर्मचाऱ्यांवर येते. त्यामुळे रेल्वे रुळांच्या देखभाल दुरुस्तीचे काम कासवगतीने होताना दिसते. काही वेळा या भागात रेल्वे रुळांची पुरेशी सुरक्षा राखली जात नसल्यामुळे काही ठिकाणी रेल्वेच्या साहित्याची चोरी होऊन अपघाताची परिस्थिती निर्माण होते.

मध्य रेल्वेच्या मार्गावर क्षमतेपेक्षा जास्त लोकल गाड्या धावत असून एक हजार 600 हून अधिक गाड्या रुळांवरून दरदिवशी धावतात. रुळांच्या क्षमतेपेक्षा साडेतीनशे जास्त गाड्या या मार्गावरून धावत असल्यामुळे त्यांच्या देखभाल दुरुस्तीला पुरेसा वेळ देता येत नसल्याची कबुली रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांनी नुकतीच प्रवासी संघटनांच्या बैठकीदरम्यान दिली होती. त्यामुळे रेल्वे प्रशासन या तांत्रिक बिघाडापुढे हतबल असल्याचे दिसते. हे टाळण्यासाठी आवश्‍यक सुरक्षा योजना अवलंबण्याची गरज आहे.
- मनोहर शेलार, प्रतिनिधी, उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com