कल्याणमध्ये एकाचा लेप्टोने मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 ऑगस्ट 2018

कल्याणमधील मोहना कॉलनी परिसरात लेप्टोने 57 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर या परिसरात पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने येथे साथरोग उद्रेक जाहीर केला असून, अनेक घरातील पाण्याच्या साठ्यात डेंगीच्या आळ्या सापडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

कल्याण : कल्याणमधील मोहना कॉलनी परिसरात लेप्टोने 57 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर या परिसरात पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने येथे साथरोग उद्रेक जाहीर केला असून, अनेक घरातील पाण्याच्या साठ्यात डेंगीच्या आळ्या सापडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीत जुलै महिन्यात मुसळधार पाऊस पडला होता. त्यानंतर या परिसरात साथीच्या आजारांमध्ये वाढ झाली आहे. जुलै महिन्यात पावसाचे पाणी अनेक घरांत घुसले होते. त्यामुळे अनेक घरांमध्ये संशयित लेप्टो रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. 15 ऑगस्ट रोजी मोहना कॉलनीमध्ये संशयित लेप्टो ने 57 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्याने पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने या परिसरात साथरोग उद्रेक जाहीर केला आहे. साथीचे आजार पसरू नयेत म्हणून शनिवारपासून नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच स्वच्छता आणि साथीचे आजार यावरही नागरिकांचे प्रबोधन करण्यात येईल. 

शनिवारी मोहना कॉलनी परिसरात विशेष पथकाने एक हजार 674 नागरिकांच्या आरोग्याची तपासणी केली. लेप्टो आजार होऊ नये म्हणून हजारो नागरिकांना गोळ्या वाटप करण्यात आल्या. यावेळी नागरिकांनी घरात साठा केलेल्या 303 पाण्याच्या भांड्यांमधील साठ्याची 303 तपासणी केली असता 7 ठिकाणी डेंगीच्या आळ्या सापडल्या. या परिसरात अनेक ठिकाणी कचरा आणि घाणीचे साम्राज्य, तसेच पाण्याची दलदल असल्याने आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. 

उपाययोजना कागदावरच 
1 जूनपासून आतापर्यंत पालिका हद्दीत संशयित लेप्टोचे 4 रुग्ण आढळून आले आहेत. त्यात तीन जणांचा मृत्यू झाला असून पालिकेच्या उपाययोजना केवळ कागदावर असल्याने नागरिकांत संतापाचे वातावरण आहे.

Web Title: due to Lepto death of one in Kalyan