नोटाबंदीमुळे अनेक चित्रपट तूर्त अंधारात

ban-note
ban-note

मुंबई -पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटाबंदीचा फटका चित्रपटसृष्टीला चांगलाच बसलेला आहे. काही चित्रपटांचे चित्रीकरण ठप्प झाले आहे; तर काही चित्रपट निर्मात्यांनी आपापल्या चित्रपटाचे चित्रीकरण पुढे ढकलले आहे. चित्रपटनिर्मितीची संख्या काहीशी घटणार आहे; शिवाय कलाकारांच्या सुपारीलाही याचा मोठा फटका बसणार आहे. 

सध्या चित्रपटनिर्मितीची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. केवळ हिंदीच नाही; तर मराठीमध्येही तीच परिस्थिती आहे. हौशेनवशे निर्माते येत आहेत आणि चित्रपट बनवीत आहेत. त्यातील काही निर्माते काळा पैसा पांढरा करण्यासाठी चित्रपट बनवीत असतात. कोट्यवधी रुपये त्यांनी गुंतविलेले असतात. यातील काही व्यवहार रोखीने होत असतात. आता या व्यवहाराला चाप बसणार आहे. सध्या सेटवर असलेल्या काही मराठी व हिंदी चित्रपटांनाही मोठा फटका बसला आहे. काही चित्रपट निर्मात्यांनी आपल्या चित्रपटाचे चित्रीकरण पुढे ढकलेले आहे; तसेच दर महिन्याला कलाकारांना कुठे ना कुठे तरी सुपारी ही ठरलेली असतेच. साखरपुडा, लग्न, वाढदिवस; तसेच अन्य सार्वजनिक कार्यक्रमांना कलाकार हजेरी लावत असतात. महिन्याला ५० ते ७५ लाख रुपये केवळ विविध ठिकाणी उपस्थिती लावण्याचे कलाकारांना मिळतात. केवळ शहरातच नाही; तर गावोगावी हे कलाकार जात असतात. दहीहंडी, नवरात्रोत्सव अशा काही सणांच्या दिवशी या कलाकारांच्या सुपारीचा दर भलताच वधारलेला असतो. विशेषकरून मुंबईबाहेरची सुपारी महागडी असते. याबाबत कांचन अधिकारी म्हणाल्या, की चित्रपटनिर्मितीला मोठा फटका बसणार आहेच; शिवाय कलाकारांच्या सुपारीवर नक्कीच परिणाम होणार आहे. कारण हे पैसे ब्लॅकमध्येच मिळत असतात. विजय पाटकर म्हणाले, की काही निर्मात्यांनी आपले चित्रीकरण पुढे ढकललेले आहे. चित्रपटसृष्टीची गाडी योग्य पद्धतीने रुळावर येण्यासाठी तीन ते चार महिने लागणार असल्याने चित्रपटनिर्मितीची संख्या घटणार आहे. कलाकारांना आता सुपारी देण्यासाठी पैसेच नाहीत. त्यामुळे ही संख्याही कमी होणार आहे.

परफॉर्मन्सचे तीन लाख!

निव्वळ उपस्थिती आणि परफॉर्मन्स यांचे दर वेगवेगळे असतात. नायिकांचे एकेका परफॉर्मन्सचे दर एक ते तीन लाख रुपये असतात. ही सगळी रक्कम त्यांना रोख स्वरूपात मिळत असते. क्वचितच काही कलाकार धनादेश स्वीकारतात. अन्य कलाकार धनादेशाऐवजी रोख पैसे मागतात. मात्र, आता पाचशे आणि एक हजारच्या नोटाच चलनातून बाद करण्यात आल्यामुळे कलाकारांच्या या मानधनावर कुऱ्हाड येणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com