
Mumbai News : टीसीच्या तत्परतेमुळे लोकलमध्ये विसरलेली बॅग प्रवाशांला परत!
मुंबई : मध्य रेल्वेच्या मुख्य तिकीट निरीक्षक भाग्यश्री खोपडे यांच्या तत्परतेमुळे एका प्रवाशांची लोकलमध्ये विसरलेली बॅग पुन्हा मिळाली आहे. मात्र, ही बॅग मिळविण्यासाठी रेल्वे यंत्रणेला लोकलचा पाठलाग करावा लागला आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबाद येथून शनिवारी मिनेश पांचाळ हा तरुण कामानिमित्त मुंबईत आला होता. त्यांनी कल्याणहून परळला येणारी लोकल पकडली परंतु ते माटुंगा स्थानकात उतरले तेव्हा बॅग विसरल्याने त्यांच्या लक्षात आले.
त्यांनी माटुंगा रेल्वे स्थानकात याबाबत तक्रार केली असता त्यांना दादर जीआरपी कार्यालयात तक्रार करण्यास सांगण्यात आले. परंतु ते मुख्य तिकीट निरीक्षक भाग्यश्री खोपडे यांच्याकडे गेले. भाग्यश्री यांनी चौकशी केली असता ती गाडी परळहुन डोंबिवलीकडे गेली होती.त्यांनी टीसी कार्यालयाला सूचना करून बॅग शोधण्याची विनंती केली.
तो पर्यंत डोंबिवलीहुन ती गाडी मुंबईच्या दिशेने निघाली होती. मोठ्या पराकाष्ठेनंतर ती बॅग मिळविण्यात यश आले. खोपडे यांनी ती बॅग प्रवाशाकडे सुपूर्त केली. या बॅगमध्ये व्यवसायाची महत्त्वपूर्ण कागदपत्रे तसेच थोडीफार रक्कम होती. प्रवासी पांचाळ यांना त्यांची हरविलेली बॅग जशीच्या तशी परत मिळाल्याबद्दल त्यांनी मुख्य तिकीट निरीक्षक भाग्यश्री खोपडे यांचे आभार मानले.