पादचारी पूलाच्या कामामुळे कल्याण ते टिटवाळ्यात मेगा ब्लॉक

mumbai.jpg
mumbai.jpg

कल्याण  : शहाड रेल्वे स्थानकात पादचारी पुलाचे गर्डर टाकण्याच्या काम चालू असल्यामुळे मध्य रेल्वेने कल्याण ते टिटवाळा रेल्वे स्थानक दरम्यान आज रविवार (ता. 10  सकाळी पावणे अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक जाहीर केला होता. यामुळे कल्याण ते कसारा दरम्यान रेल्वे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.

मध्य रेल्वेच्या शहाड रेल्वे स्थानकात पादचारी पुलाचे गर्डर कामासाठी मध्य रेल्वेने आज रविवार (ता :10) फेब्रुवारी सकाळी पावणे अकरा ते दोन वाजेपर्यंत कल्याण ते टिटवाळा रेल्वे स्थानक दरम्यान विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक जाहीर करत कामाला सुरुवात झाली. कल्याण ते टिटवाळा रेल्वे सेवा ठप्प असताना त्यात टिटवाळा ते कसारा एक ही लोकल न धावल्याने टिटवाळा, आसनगाव आणि कसारा रेल्वे स्थानकावर ताटकळत प्रवाशांंना उभे राहावे लागले तर, कामानिमित्त बाहेर पडलेल्या प्रवाशांना अव्वाच्या सव्वा भाडे देऊन खासगी वाहनातून प्रवास करावा लागला.

शनिवारी रात्री उशिरा टीव्ही चॅनेल आणि सकाळी काही वृत्तपत्रात बातम्या वाचून मेगाब्लॉक असल्याचे समजले. मात्र ग्रामीण भागात सर्व जण चॅनल अथवा पेपर वाचत नसून रेल्वे प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे आसनगाव, नाशिक, कसारा, टिटवाळा मधील प्रवाशांना त्रास झाला असून पुढील काळात मेगाब्लॉक घेतल्यास दोन दिवस अगोदर जाहीर करण्याची मागणी कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष राजेश घनघाव यांनी केली आहे .


केडीएमटीचा दिलासा ....
कल्याण ते टिटवाळा दरम्यान रेल्वे प्रवाशांचे हाल होऊ नये म्हणून केडीएमटी व्यवस्थापक मारुती खोडके यांच्या आदेशानुसार संदीप भोसले, श्याम पष्टे आणि अन्य अधिकारी वर्गाच्या विशेष पथकाने कल्याण ते टिटवाळा या मार्गावर विशेष केडीएमटी बसेस सोडल्या. यात 36 फेऱ्या झाल्या, कल्याण ते टिटवाळा मार्गावर 1 हजार 375 प्रवासी आणि टिटवाळा ते कल्याण मार्गावर 1 हजार 425 असे एकूण 2 हजार 800 प्रवाशांनी प्रवास केला. यात 52 हजार रुपये उपन्न मिळाले. केडीएमटी बस सोडल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला. मात्र दुपारी बारा नंतर कल्याण आणि टिटवाळा मार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीचा फटका सर्व सामान्य नागरिकांना बसला.

कल्याण ते टिटवाळा लोकल सेवा बंद असल्याने रिक्षावाल्यांनी दिवाळी साजरी केली. कल्याण रेल्वे स्थानक परिसर मधून 75 ते 150 रुपये प्रति सीट प्रवासी भाडे घेऊन प्रवासी वर्गाची लूटमार केली. तर, टिटवाळा ते आंबिवली प्रति सीट 60 रुपये तर टिटवाळा ते कल्याण प्रति सीट 150 रुपये भाडे घेत रिक्षा वाल्यानी चांगलीच दिवाळी साजरी केली .

सध्या माघी गणेशोत्सव सुरू असून टिटवाळा येथे भाविक आले मात्र या मेगाब्लॉकमुळे त्यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. कल्याण पुढील कसारा रेल्वे मार्गावरील प्रवाश्यांना प्रतिदिन हाल होत असून आजच्या मेगाब्लॉकमुळे मनस्ताप सहन करावा लागला असून प्रवाश्यांचा उद्रेक झाल्यावर प्रशासन जागे होणार का ? असा सवाल केला जात आहे. दुपारी मेगाब्लॉक संपताच रेल्वे प्रशासनाने पहिल्या मेल गाड्या सोडत लोकल गाड्या नंतर सोडल्याने त्या प्रवाशांची जखमेवर मीठ चोळल्याचा आरोप प्रवासी संघटनेने केला आहे .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com