...'यांनी' लावलाय गतिमान शहराला ब्रेक!

...'यांनी' लावलाय गतिमान शहराला ब्रेक!
...'यांनी' लावलाय गतिमान शहराला ब्रेक!

नवी मुंबई : विविध विकासकामांतर्गत शहरात अनेक ठिकाणी कामे सुरू आहेत. त्यासाठी अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. मात्र, खोदलेले हे रस्ते चुकीच्या पद्धतीने बुजवल्याने वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे वाहनांची कोंडी होत आहे. त्यात पालिका निवडणुका जवळ आल्याने प्रत्येक प्रभागातील नगरसेवकांनी विकासकामे हाती घेतल्याने सुस्थितीत असलेल्या गटार, पदपथ, रस्त्यांची कामेदेखील केली जात आहे. दैनंदिन जीवनावर त्याचा फटका बसू लागल्याने शहरातील खोदकामे नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. 

शहरातील खोदकामांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. विविध कामांसाठी हे खोदकाम करण्यात येते. मात्र, हे खड्डे वेळेत बुजवले गेले नसल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यात अनेक इमारतींच्या बाजूने रस्त्यावरील खड्डे खणले गेल्याने वाऱ्यामुळे धूळ उडून याचा त्रास नागरिकांना होत आहे. हे खड्डे दुरुस्त करावेत, अशी मागणी वाढत चालली आहे. रस्ते दुरुस्त केल्यावर पुन्हा खोदकाम करायचे. त्यावर पुन्हा डांबरीकरण करायचे, असा ढिसाळ कारभार शहरात सर्रास पाहायला मिळत आहे. दुरुस्ती डांबरीकरण केलेला गुळगुळीत रस्ता अवघ्या काही दिवसांत वीजवाहिन्या, गॅस लाईन अथवा काही कारणास्तव खोदला जातो. त्यामुळे नाहक नागरिकांना त्रास सोसावा लागतो. करदात्या नागरिकांचा पैसा यामुळे वाया जात आहे. पालिकेने सध्या सायकल योजना शहरात आणली आहे. ही सायकल योजना अल्पावधीतच नागरिकांच्या पसंतीस उतरली आहे. त्यामुळे नेरूळ, सीवूड्‌स व बेलापूर भागात अनेक तरुण-तरुणी व नागरिक सायकल चालवताना दिसतात. त्यात पावसाळ्यानंतर दुरुस्त करण्यात आलेले अनेक रस्ते हे एमएसईबी व महानगर गॅस लाईनसाठी खोदलेले आहेत. त्यात हे खोदलेले खड्डे रस्त्याकडेला असल्याने दुचाकी व सायकलस्वारांना मात्र त्रासाला सामोरे जावे लागते. 

या ठिकाणी खोदकाम 
सीवूड्‌स दारावे, बेलापूर, नेरूळ, सानपाडा, जुईनगर, घणसोली, तुर्भे, कोपरखैरणे, वाशी, ऐरोली येथील अंतर्गत रस्ते; तसेच गावांशेजारील रस्त्यांवर खोदकाम करण्यात आले आहे. बऱ्याच दिवसांच्या कालावधीनंतरही या रस्त्यांची परिस्थिती अजूनही तशीच आहे. रस्ते खोदकाम केल्याने वाशी ते कोपरखैरणे या मार्गावर वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांना तब्बल एक तास वाहतूक कोंडीत ताटकळत थांबावे लागत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com