मूकबधिर मुलीला दत्तक घेण्यास विरोध

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 मे 2018

मुंबई - बोलण्यास अडचण येत असलेल्या मुलीला दत्तक घेण्यास नकार देणाऱ्या पालकांवर मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित पालकांच्या यापुढील दत्तक अर्जांवरील प्रक्रिया न्यायालयाच्या परवानगीविना संमत करू नये, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

मुंबई - बोलण्यास अडचण येत असलेल्या मुलीला दत्तक घेण्यास नकार देणाऱ्या पालकांवर मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित पालकांच्या यापुढील दत्तक अर्जांवरील प्रक्रिया न्यायालयाच्या परवानगीविना संमत करू नये, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

कर्नाटकमध्ये राहणाऱ्या पालकांनी मूल दत्तक घेण्यासाठी मुंबईतील संस्थांशी संपर्क साधला. एका मुलीला त्यांनी पसंतीही दिली. याबाबत प्रक्रिया पूर्ण करण्याच्या आधी काही दिवस ही मुलगी त्यांच्यासह होती; मात्र यादरम्यान मुलीला बोलताना त्रास होत असल्याचे दत्तक घेणाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी मुलीला संस्थेमध्ये परत सोडून दत्तक घेण्यास नकार दिला.

संस्थेने न्यायालयात याचिका केली होती. पालकांच्या अशा प्रकारच्या भूमिकेबाबत न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. बोलण्यात अडचण आहे म्हणून मुलीचे दत्तक पालकत्व नाकारण्याचा निर्णय खेदजनक आहे, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. संबंधित मुलीला भारतात किंवा परदेशात दत्तक देण्याबाबत संस्थेने प्राधान्याने प्रयत्न करावा, असे निर्देश न्यायालयाने संस्थाचालकांना दिले आहेत. तिला दत्तक घेण्यास नकार देणाऱ्या पालकांना यापुढे अन्य मुलांच्या दत्तक प्रक्रियेमध्ये संमती देण्यापूर्वी उच्च न्यायालयाची परवानगी घेणे बंधनकारक आहे, असे आदेशही न्यायालयाने बालक दत्तक नियोजन प्राधिकरणाला दिले आहेत. संबंधित मुलीचा तिच्या दत्तक वडिलांशी विशेष लळा होता. तिच्या बोलण्यातही सुधारणा होत होती, असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. यात सुधारणा होऊ शकते असेही स्पष्टीकरण करण्यात आले.

पालकांना दत्तक प्रक्रियेस परवानगी आवश्‍यक
केवळ वैद्यकीय कारणांवरून मुलीला दत्तक घेण्यास पालकांनी नकार दिल्याबद्दल न्यायालयाने खेद व्यक्त केला. अशा प्रकारची भूमिका पालकांनी घेणे चिंताजनक आहे. त्यामुळे यापुढे त्यांनी केलेल्या अर्जाची दखल न्यायालयाच्या परवानगीनंतरच घ्यावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

Web Title: Dumbbell girl adopt oppose high court